
अलिकडेच दिल्लीच्या एका न्यायालयात आरोपीने न्यायाधीशांना उघडपणे धमकी दिली होती. चेक बाउन्स प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर एका आरोपीने आणि त्याच्या वकिलाने न्यायालयातच एका महिला न्यायाधीशाला धमकावले आणि शिवीगाळ केली होती. यानंतर दिल्लीत पुन्हा एकदा एका न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची घटना समोर आली आहे. येथील द्वारका न्यायालयाच्या न्यायाधीशांना अज्ञात व्यक्तींनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 1 एप्रिल रोजी द्वारकेतील काक्रोला गावात दोन अज्ञात व्यक्तींनी न्यायाधीशांना धमकी दिली होती.
याप्रकरणी 16 एप्रिल 2025 रोजी एफआयआर दाखल करण्यात आली. या एफआयआरनुसार, न्यायाधीशांनी आरोप केला की, 1 एप्रिल रोजी न्यायाधीश संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास त्यांच्या घरातून एका सार्वजनिक शाळेकडे जात होते. यावेळी कारमधून आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांच्या मागे 10 मीटर अंतरावर वाहन थांबवले आणि चार ते पाच वेळा हॉर्न वाजवला.
या प्रकरणी पोलिसात नोंदवलेल्या एफआयआरनुसार न्यायाधीशांनी आरोप केला आहे की, “मी मागे वळून पाहिले तेव्हा वाहनात दोन व्यक्ती होते. त्यातील ड्रायव्हर माझ्यावर ओरडून म्हणाला की, ‘तू वाचून राहा, आम्ही थेट गोळ्या घालू. जगायचे असेल तर कमी बोल.’ धमकी दिल्यानंतर ते पसार झाले.” एफआयआरनुसार, न्यायाधीशांनी सांगितले की, त्यांनी वाहनाची नंबर प्लेट पाहिली नाही. दरम्यान, पोलीस या दोन्ही अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.