>> नीलेश कुलकर्णी, [email protected]
गेली दहा वर्षे विरोधकांना खिजगणतीत न धरता आक्रमक पद्धतीने राज्य कारभार करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱया टर्ममध्ये पहिल्याच अधिवेशनात ‘बॅकफूट’वर गेलेले दिसले. 18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन हे नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी व राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चा यापुरते मर्यादित असले तरी या अधिवेशनात आगामी पाच वर्षांत काय होणार आहे, याचे ‘ट्रेलर’ दिसून आले. विरोधक ‘फॉर्मा’त तर सत्ताधारी ‘बॅकफूट’वर दिसले.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पहिल्याच अधिवेशनात गवसलेला सूर ही विरोधकांसाठी जमेची, तर सत्ताधाऱयांसाठी चिंतेची बाजू ठरली. राहुल गांधी इतक्या मुद्देसूदपणे सरकारवर तुटून पडले की, देशाच्या पंतप्रधान व गृहमंत्र्यांना राहुल गांधी यांच्या भाषणापासून अध्यक्षांकडे संरक्षण मागावे लागले. यापुढे विरोधकांचा आवाज सरकारला दडपता येणार नाही, हा लोकशाहीच्या हिताचा इशाराच या अधिवेशनाने दिला आहे. देशाच्या पंतप्रधानांपेक्षा विरोधी पक्षनेत्याचे भाषण या अधिवेशनात अधिक गाजले. नरेंद्र मोदी हे उत्कृष्ट वक्ते व त्याहीपेक्षा उत्तम दर्जाचा अभिनय करणारे आहेत. मात्र हे दोन्ही अभिनिवेश या अधिवेशनात गळून पडले. लोकसभेतील भाषणावेळी घसा कोरडा पडल्याने तब्बल 11 वेळा मोदींना पाणी प्यावे लागले यातच सगळे आले. आता पाच वर्षे विरोधक त्यांचा घसा असाच कोरडा पाडतील व सरकारसाठी तो कसोटीचा काळ असेल.
संसदेच्या पहिल्या अधिवेशनाने काय साध्य झाले? तर विरोधकांना या अधिवेशनाने आत्मविश्वास दिला. सत्ताधाऱयांना नुसते हरवताच येत नाही तर सुतासारखे सरळही करता येते हा विश्वास दिला. त्याचेच प्रतिबिंब अधिवेशनात उमटले. ‘नीट’ परीक्षेच्या विषयावर विरोधकांनी सरकारला चर्चा घडवून आणायला भाग पाडायला हवे होते, ही एकमेव त्रुटी वगळली तर अधिवेशन विरोधकांनी गाजवले. अध्यक्ष निवडीनंतर राहुल गांधी, अखिलेश यादव, सुदीप बंडोपाध्याय या विरोधी नेत्यांनी केलेली भाषणे ही अध्यक्षांच्या ‘गुणगौरव’पर होती खरी. मात्र त्यातून उपरोधिक पद्धतीने अध्यक्षांच्या कार्यशैलीचीच पोलखोल केली गेली. राष्ट्रपतींच्या धन्यवाद प्रस्तावावर राहुल गांधींनी उत्तम दर्जाचे भाषण केले. त्यातुलनेत पंतप्रधानांनी केलेले भाषण फिके ठरले, हे गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच घडले! विरोधी खासदारांच्या विरोधामुळे पंतप्रधानांना दोन वेळा भाषण थांबवावे लागले, तर राहुल गांधींच्या भाषणात दोन वेळा उठून मोदी-शहा जोडीला हस्तक्षेप करावा लागला, इथेच राहुल गांधी यांनी लढाई जिंकली. राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारला काsंडित पकडले. दोन्ही सभागृहांत सभात्यागाची आयुधे विरोधकांनी चांगलीच अमलात आणली.
दोस्त दोस्त ना रहा!
अठराव्या लोकसभेसह मोदींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार सत्तेवर आले आणि त्यामुळे बरेचसे राजकीय संदर्भही बदलले. भाजपचे यापूर्वीचे अनेक मित्रपक्ष हे त्या पक्षाच्या ‘वापरा, संपवा आणि फेका’ या धोरणामुळे दूर झाले. ज्या नवीनबाबू पटनायकांनी भाजपशी घरोबा करून भाजपला जनमानसात स्थान मिळवून दिले. त्याच नवीनबाबू पटनायक यांचा भाजपने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव केला. लोकसभेत तर नवीनबाबूंचा एकही खासदार निवडून येऊ शकला नाही. मात्र राज्यसभेत नवीन पटनायक यांचे नऊ खासदार असल्याने त्यांच्या संख्याबळाला मोठे महत्त्व आहे. गेली दहा वर्षे भाजपला सातत्याने पाठिंबा देणारा नवीनबाबूंचा पक्ष या वेळी राज्यसभेत सरकारविरोधात सभात्याग करण्यात सर्वात आघाडीवर होता. यामागचे कारण सगळय़ांनाच माहिती आहे. मात्र बिजू जनता दलाचे म्हणणे वेगळेच आहे. ओडिशाला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी पेंद्र सरकार पूर्ण करत नसल्याने आम्ही विरोधी बाकांवर आहोत, असे त्या पक्षाचे म्हणणे. मग गेली दहा वर्षे ‘मनोमिलनाच्या माळा’ एकमेकांच्या गळय़ात घातलेल्या असताना ही मागणी बिजू जनता दलाने पूर्णत्वास का नेली नाही? हा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे. ओडिशातील जनतेची सहानुभूती मिळविण्याचा नवीनबाबूंचा हा प्रयत्न आहे. मात्र तो यशस्वी होण्याची शक्यता सुतरामही नाही.
धनखड आणि खरगे
राज्यसभेत सभापती जगदीप धनखड आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यात जबरदस्त अशी खडाजंगी पाहायला मिळाली. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मात्र हे तणावाचं वातावरण हलपं-फुलपं करण्याचा सभापतींनी प्रामाणिक प्रयत्न केला. कामकाज सुरू होताच सभापतींनी खरगे यांचा आदर-सन्मान करत त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. विरोधी पक्षनेत्याच्या भाषणामध्ये कोणीही व्यत्यय आणू नये, असा सज्जड दम सत्ताधारी बाकाला दिला. त्यामुळे खरगे सुखावले. त्यावर कोटी करत धनखड म्हणाले, ‘‘आज अच्छा कामकाज होगा.’’ त्यावर प्रतिकोटी करत खरगे यांनी ‘‘आज का क्या होगा क्या पता?’’ अशी शेरोशायरी सुनावली. त्यावर धनखड म्हणाले की, ‘‘माझे पूर्ववती व्यंकय्या नायडू या शेरोशायरीत माहीर होते. मला ते तितपं जमत नाही.’’ त्यावर खरगे यांनी एक टोला मारला, ‘‘नवीन नवीन उपराष्ट्रपती भवनात तुम्ही गृहप्रवेश केला. मात्र फक्त सत्ताधारी लोकांनाच बोलावलं आम्हाला नाही बोलावलं.’’ त्यावर धनखड यांनी खरगेंचीच फिरकी घेतली. ‘‘मी संबंध जपणारा माणूस आहे. वाटल्यास ममता बॅनर्जींना विचारा’’ असं म्हणताच ममतादीदींचे नाव ऐकताच सभागृहात हास्याची लकेर उमटली. धनखड आणि ममतदीदींचा राजकीय संघर्ष धनखड बंगालचे राज्यपाल असताना सगळय़ांनीच पाहिला होता. ‘‘गृहप्रवेशाच्या वेळी मी फक्त तीन लोकांना पह्नवरून आमंत्रित केलं. त्यात तुम्ही होता. मात्र तुम्ही जावयाच्या प्रचारात ‘बिझी’ होता. त्यामुळे तुमच्या कदाचित स्मरणात नसेल,’’ असा भीमटोला धनखड यांनी मारला. हसतखेळत खेळीमेळीच्या वातावरणात सभागृहाचे कामकाज सुरू झाले. हल्ली राजकारणाचा स्तर इतका खालावला आहे की, अशा खेळीमेळीच्या चर्चा, खेळीमेळीचे संवाद खुंटलेले आहेत. धनखड आणि खरगे यांनी हा संवाद शेवटच्या दिवशी का होईना किमान झाला, हे काय कमी आहे?