दिल्ली डायरी – बिहार – ‘संक्रांत’ कुणावर; तिळगूळ कुणाला?

संक्रांतीच्या पवित्र मुहूर्तावर जयप्रकाश नारायणांचे दोन शिष्योत्तम नितीशबाबू व लालू यादव हे एकमेकांना तोंड भरून तिळगूळ भरवतील आणि त्यामुळे दिल्लीतील महाशक्तीच्या सरकारवर ‘संक्रांत’ येईल, असे सध्या राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. मात्र नितीश-लालू हे एकत्रित येतील काय? त्यांना एकत्र येऊ दिले जाईल काय याबाबत साशंकता आहे. त्यामुळे बिहारमध्ये ‘संक्रांत’ कोणावर येणार आणि ‘तिळगूळ’ कोणाला मिळणार, अशी चर्चा सुरू आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशबाबूंची तब्येत सध्या तोळामासा आहे. त्यांना विस्मरणाचा गंभीर आजार जडला आहे. त्याचे अनेक किस्से सध्या चर्चेत आहेत. हे किस्से कसे जाणीवपूर्वक सर्वव्यापी होतील, याकडे भाजपचे विशेष लक्ष आहे. नितीशबाबू हे पक्ष व सरकार चालविण्यास सक्षम नाहीत, हा मेसेज कधीच त्यांच्या केडरमध्ये गेलेला आहे. त्यामुळे नितीशबाबूंनंतर कोण यावरून मोठे घमासान होण्याची चिन्हे आहेत. इतकी वर्षे राजकारणात राहूनही नितीशबाबूंनी कधी मुलाला किंवा कुटुंबातील कोणालाही राजकारणात आणले नाही हे त्यांचे वेगळेपण आहे. मात्र हल्ली त्यांचे चिरंजीव नितीशबाबूंसोबत सातत्याने दिसतात. त्यामुळे नितीश कुमार मुलाकडे वारसा देतात काय याबाबतही चर्चांना उधाण आले आहे. नितीश कुमारांनी समजा लालूंचे तोंड ‘गोड’ केले तर केंद्रातील सरकार लागलीच पडणार नसले तरी मोदींपुढच्या अडचणी नक्कीच वाढणार आहेत. हे लक्षात घेऊनच अरिफ मोहंमद यांना बिहारच्या राजभवनात स्थानापन्न करण्यात आले आहे.

अडचणीच्या काळात भाजपच्या सत्तेचे भोई झालेल्या नितीशबाबूंचा पक्ष सध्या भाजपच्या चाणक्यांनी टेकओव्हर केला आहे. नितीश कुमारांच्या आजारपणाचा फायदा घेऊन सध्या हे सगळे घडत आहे. जदयुचे अध्यक्ष संजय झा हे मोदी-शहांच्या दरबारीच असतात. दुसरे नेते लल्लनसिंग हे या महाशक्तीचे दुलारे आहेत. उरलीसुरली कसर राज्यसभेचे उपसभापती हरिवंशसिंग यांनी भरून काढली आहे. नितीश कुमारांचा पक्ष भाजपच्या ताब्यात देण्याची मुहूर्तमेढ याच हरिवंशन यांनी रचली आणि बदल्यात उपसभापतीपद पदरात पाडून घेतले, याबाबतची खुमासदार चर्चा कानावर पडते. राजकीय आयुष्यात विक्रमी इमले रचणारे नितीशबाबू एकाकी पडलेले आहेत. नितीशबाबूंनी लालूंशी जवळीक साधताच त्यांना पक्षातून कडाडून विरोध झाला आहे हे लक्षात घेता नितीश कुमारांच्या हातातले पक्षाचे ‘सुकाणू’ निसटले आहे, असेच म्हणावे लागेल.

जयशंकर अमेरिकेत कशाला?

परराष्ट्रमंत्री जयशंकर हे अमेरिकेत इतके दिवस का ठाण मांडून बसले आहेत? याबाबत रोचक व रंजक माहिती मिळत आहे. शपथविधीचा मांडव घातला तरी ट्रम्प तात्यांनी आपल्या पंतप्रधानांना सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवतण धाडलेले नाही. त्यामुळे त्यासाठी जयशंकर अमेरिकेत ‘व्हाईट हाऊस’पुढे घिरट्या मारत आहेत, असे बोलले जात आहे. अर्थात माहिती मिळाली ती वेगळी आणि रोचक, रंजक अशीच. मोदींचे लाडके उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते ‘क्लब’ करण्यात आले आहेत. हे गुन्हे ‘लीगल काwन्सिल’ ऐवजी ‘फेडरल कोर्टा’कडे वर्ग करण्यात आले आहेत. अमेरिकेत ‘लीगल काwन्सिल’ हे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या अधिकार कक्षेबाहेर असते. मात्र फेडरल कोर्टाच्या निर्णयात राष्ट्राध्यक्ष हस्तक्षेप करू शकतात. ट्रम्प यांनी मागच्या कार्यकाळात याच अधिकारांचा वापर करून 144 प्रकरणांत दोषींना सहीसलामत ‘बाहेर’ काढले होते. त्यावर अमेरिकेत टीकेची मोठी झोडही उठली होती. त्यामुळे जयशंकर हे अदानींची वकिली करण्यासाठी व्हाईट हाऊसची रदबदली करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. देश वाऱयावर सोडून उद्योगपतींना वाचविण्यासाठी काम करणारे परराष्ट्रमंत्री आपल्याला लाभले आहेत, अजून कोणते ‘अच्छे दिन’ आपल्याला हवेत?

24 अकबर रोड

‘24 अकबर रोड’ हे देशाच्या राजकारणातल्या अनेकानेक रोचक, रंजक कहाण्यांचे काँग्रेस मुख्यालय आता इतिहासजमा होणार आहे. ज्या इच्छुकांनी अनेक वर्षे तिकिटे मिळविण्यासाठी, पदप्राप्तीसाठी या मुख्यालयाचे उंबरे झिजवले, त्या काँग्रेस जनांना आता आपल्या हायकमांडला भेटण्यासाठी वाकडी वाट करत ‘9ए, कोटला मार्गा’वरील आलिशान अशा ‘इंदिरा भवन’कडे जावे लागणार आहे. कॉंग्रेस व भाजप परस्परांचे कट्टर राजकीय वैरी असले तरी देशातील दोन महत्त्वाच्या राष्ट्रीय पक्षांची मुख्यालये एकाच रस्त्यावर असावीत हाही योगायोगच! भाजपने मुख्यालयाचा पत्ता ‘दीनदयाळ उपाध्याय मार्ग’ असा दिला आहे. अर्थात तिथल्या रस्त्यालाही तेच नाव आहे. मात्र हे नाव काँगेसला रुचणारे व पचणारे नसल्यामुळे कोटला क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलले असले तरी काँग्रेस जनांनी ‘कोटला मार्ग’ हाच पत्ता मुक्रर केला आहे. 1977 मध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस (आय)चे मुख्यालय ‘24, अकबर रोड’ बनले होते. त्यानंतर गेले अर्धशतक हे मुख्यालय राजकारणातल्या अनेक अजरामर कहाण्यांचे प्रतीक बनले आहे. याच मुख्यालयात सोनिया गांधींच्या राजकारणातील प्रवेशाला विरोध केला म्हणून संतापलेल्या कॉंग्रेस जनांनी सीताराम केसरींना मुतारीत बंद केल्याचा प्रसंगही तसाच रोमहर्षक आहे. ‘दस जनपथ’ या सोनिया गांधींच्या निवासस्थानाच्या शेजार असलेले ‘24, अकबर रोड’ म्हणूनच ‘विशेष लौकिक’ प्राप्त करून गेले. ‘पॉवर सेंटर’ म्हणून सोनिया गांधींचा उदय याच मुख्यालयातून झाला. ‘दस जनपथ’चा वचक, दरारा याचमुळे वाढला. 2009 मध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान असताना नव्या काँगेस भवनाची कुदळ मारली गेली होती. हे मुख्यालय बांधायला काँग्रेस जनांना सोळा वर्षे लागली, हेदेखील लक्षात घेण्यासारखे आहे.