>> नीलेश कुलकर्णी
जम्मू–कश्मीरमधून 370 कलम हटविल्यानंतर तब्बल सहा वर्षांनी कश्मीरच्या खोऱ्यांत निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. या निवडणुकीसाठी नॅशनल कॉन्फरन्ससोबत आघाडी करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. दुसरीकडे मेहबुबा मुफ्तीही या आघाडीत घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजप ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवीत आहे. सगळ्या जागा न लढता काही ठिकाणी अपक्ष व स्थानिक पक्षांना मदत करायची, अशी भाजपची रणनीती आहे. सहा वर्षांपूर्वी मेहबुबा मुफ्तींसोबत भाजपाची आघाडी घडवून आणणाऱ्या राम माधवांची ‘रिएन्ट्री’ या निवडणुकीच्या निमित्ताने झाली आहे. 370 कलम हटविल्यानंतरचे जम्मू–कश्मीर विधानसभेसाठी कोणाला कौल देते ते दिसेलच.
सहा वर्षांपूर्वी जम्मू-कश्मीरला देण्यात आलेला ‘विशेष राज्या’चा ‘दर्जा’ संपवून कलम-370 व कलम-35 रद्दबातल करण्यात आले आणि जम्मू-कश्मीर तसेच लडाखचे रूपांतर पेंद्रशासित प्रदेशात करण्यात आले होते. हा निर्णय घेतल्याने मोदी सरकारच्या आरत्याही ओवाळण्यात आल्या होत्या. मात्र कालपरत्वे या आरत्यांमधल्या वाती विझल्या आहेत. जम्मू-कश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा संपुष्टात आल्यानंतर कश्मिरी पंडित पुन्हा आपल्या घरी सुखाने परततील, अशा भूलथापा केंद्रीय सरकारने मारल्या होत्या. प्रत्यक्षात कश्मिरी पंडितांची पहिल्यापेक्षा अधिक दुरावस्था या निर्णयानंतर झाली. आता तब्बल सहा वर्षांनी या राज्यात विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. भाजप-काँग्रेससह सर्वच पक्षांनी त्यासाठी पंबर कसली आहे. जम्मू खोऱ्यांतील 43 जागांवर भाजपाची भिस्त आहे, तर कश्मीर या मुस्लिमबहुल खोऱ्यांतील 47 जागांवर काँगेसचे डोळे लागलेले आहेत. सध्या कश्मीरमध्ये काँगेसची स्थिती मजबूत असली तरी काँग्रेससोबत मेहबुबा यांना शिरकाव करू द्यायला नॅशनल कॉन्फरन्स तयार नाही. तिकडेही महाराष्ट्राप्रमाणे महाआघाडीचा प्रयोग करून भाजपाला पराभूत करता येऊ शकते. मात्र अब्दुल्ला पितापुत्र त्यासाठी राजी नाहीत. त्यातच काँगेस व त्यांच्यातला जागावाटपाचा घोळही अजूनपर्यंत मिटलेला नाही. मतांची फाटाफूट टाळण्यासाठी काँगेसने याबाबतीत खरेतर पुढाकार घ्यायला हवा होता. दुसरीकडे कश्मीरबाबतची नीती फसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहा व जे.पी. नड्डा यांना जम्मू-कश्मीरमधून खडय़ासारखे बाजूला करत राम माधव यांच्याकडे तिकडची जबाबदारी दिल्याने भाजपमध्येही आलबेल नसल्याचे सिद्ध झाले आहे. या माधवांमुळेच मेहबुबासोबत भाजपाचे सरकार जम्मू-कश्मीरमध्ये सत्तेवर आले होते. त्यानंतर अनेक वादग्रस्त कारणांमुळे राम माधवांची भाजपातली ‘सेवा’ संपुष्टात आणून त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघात परत पाठविण्यात आले. आता नागपूरकरांनी त्यांना थेट कश्मीरला पाठविले आहे. काँगेसमधून बाहेर पडून नवा पक्ष काढलेल्या गुलाम नबी आझादची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी आहे. त्यांच्या नवीन पक्षाचा प्रभाव नाही. नेते त्यांना सोडून जात आहेत. जम्मू-कश्मीरमध्ये शांतता व सुव्यवस्थेत मतदान होणे हे देशहिताचे आहे. कश्मीरमध्ये कोण सत्तेवर येईल, याकडे देशाचे नव्हे जगाचे लक्ष लागलेले आहे.
माझी रे माझी… यह क्या किया?
पंतप्रधान मोदींचे फोटोप्रेम काही लपून राहिलेले नाही. कॅमेरामन फोटो घेत असताना कोणी आडवे आले की मोदीसाहेब त्याला तिडवे केल्याशिवाय राहत नाहीत, याचा अनुभव अनेक महानुभवांनी आजवर घेतला आहे. त्यामुळे मोदींच्या फोटोप्रेमाचे आणखी वर्णन करण्याची तशी गरज नाही. मात्र हा सगळा पह्टोंचा फाफटपसारा काढण्याचे कारण घडलेही तसेच गंमतशीर. ओडिशाचे भाजपाचे मुख्यमंत्री मोहन माझी यांनी ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक विजेत्या हॉकी संघाच्या स्वागताचा एक कार्यक्रम ठेवला होता. या अभिनंदनपर कार्यक्रमाची पान भरून जाहिरात ओडिशाच्या व देशातील काही प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर झळकली. मात्र कोरोना कीट, रेशनच्या पिशव्या व युरियाच्या पोत्यावरही ज्यांची छबी पाहण्याची जनतेला सवय झालीये त्या जनतेला ही जाहिरात पाहून काहीतरी चुकल्याचुकल्यासारखे वाटले. या जाहिरातीत चक्क देशाचे लाडके पंतप्रधानच नव्हते…!! ही अक्षम्य चूक लक्षात आल्यावर मोहन माझी यांच्या पायाखालची वाळूच सरकली. दुसऱ्यांच दिवशीच्या सगळ्या पेपरांत पंतप्रधानांच्या हसऱ्यां छबीसह हीच जाहिरात पुनर्प्रकाशित करण्याचा खटाटोप करण्यासाठी मोहन माझी यांना रात्रीचा दिवस करावा लागला. मोहन माझी यांना मुख्यमंत्री पदी बसून अवघे दोन महिने झालेत, म्हणून हा गुन्हा कदाचित खपवून घेतला गेला असावा. अन्यथा ‘माझी रे माझी… ये क्या किया?’ म्हणत पह्टो न छापल्याची किंमत एव्हाना माझी यांना मोजावी लागली असती.
चाय पे चर्चा…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘चाय पे चर्चा’ निष्फळ ठरली असली तरी काँगेस व समाजवादी पक्षात झालेली चाय पे चर्चा इंडिया आघाडीला बळकटी देणारी आहे. त्याचे झाले असे की, गेल्या काही दिवसांपासून काँगेस व समाजवादी पक्षात धुसफूस सुरू आहे. लोकसभेच्या उपसभापती पदी कोणाला बसवायचे यावरूनही मतभेद आहेत. समाजवादी पक्ष हा सध्याच्या लोकसभेतला प्रभावी पक्ष आहे व अखिलेश यादवांच्या खुमासदार भाषणांनी ते लोकसभा गाजवत आहेत. या परिस्थितीत दोन्ही पक्षांतील मतभेद फार वाढू नयेत, यासाठी प्रियंका गांधी यांनी पुढाकार घेत अखिलेश व त्यांच्या खासदार पत्नी डिंपल यांना आपल्या घरी चाय पे चर्चासाठी निमंत्रित केले. या वेळी राहुल गांधीही उपस्थित राहिले. दोन्ही पक्षांमधले मतभेद या वेळी चहाच्या कपात विरघळून गेल्याचे सांगितले जात आहे. दोन वर्षांनी उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी अखिलेश यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दुसरीकडे भाजपमध्ये योगींविरोधात प्रचंड नाराजी आहे. त्याचा फायदा इंडिया आघाडीला होऊ शकतो. या सगळ्या बाबींवर चहा पिता पिता चर्चा झालीच. शिवाय अखिलेश यांची दुसरी कन्या सध्या लंडनला शिकायला जात आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या लंडनमधील शैक्षणिक आठवणी शेअर केल्या. त्यामुळे दोन्ही पक्षांत निर्माण झालेला तणाव निवळला असेल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.