दिल्ली डायरी – योगी आदित्यनाथ गोरखपूरला जाणार का?

>> नीलेश कुलकर्णी, [email protected]

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे ‘मुख्यमंत्रीपदावर उदक’ सोडून पुन्हा गोरखपूरच्या मठात जातील काय? असा सवाल सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या झालेल्या दारुण पराभवाचे खापर फोडण्यासाठी दिल्लीतील महाशक्तीला एक डोके हवे होते, ते योगींच्या रूपात मिळाले आहे. योगींच्या ठाकूरवादाने व नोकरशाहीवर विसंबून राहण्याच्या धोरणामुळे भाजपची वाताहत झाली, असा आरोप करत दिल्लीने त्यांचे पंख छाटायला सुरुवात केली आहे.

दिल्लीच्या इशाऱ्यावरूनच उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्या यांनी थेट बंडाचे निशाण हाती घेतले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या केवळ ठापूर समाजाचेच हितसंबंध जोपासण्याच्या भूमिकेमुळे इतर हिंदू भाजपपासून दुरावला व त्यांनी एकत्रित येऊन भाजपला धडा शिकवला हे खरेच. मात्र तेवढे एकच कारण भाजपच्या उत्तर प्रदेशातील दारुण पराभवाला पुरेसे नाही. अमित शहा यांचा उत्तर प्रदेशातील अतिरिक्त राजकीय हस्तक्षेप, केंद्राची चुकीची धोरणे, खोटी आश्वासने हे मुद्देही तितकेच महत्त्वाचे आहेत. मात्र दिल्लीचे अपयश लपवून योगींच्या माथी खापर फोडून नामानिराळे राहण्याची रणनीती सध्या आखली जात आहे. योगींना त्यासाठी केंद्रातील मंत्रीपदाचीही लालूच दाखविली जात आहे. मात्र ‘मुझे इस्तिफा देने के लिए बोला तो मै गोरखपूर मठ चला जाऊंगा, राजनीती नही करूंगा’ असा सांगावा योगींनी दिल्लीकरांना कळवला आहे. त्यामुळे दिल्लीकरांची कोंडी झाली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही तातडीने लखनऊला जा, असा निरोप मोदी-शहा जोडीकडून संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांना मिळाला होता. मात्र राजनाथ यांनी या वयात मला आता राज्याच्या राजकारणात कसलेही स्वारस्य नाही, असे सांगून योगींचा गेम करण्याच्या योजनेतले एक प्यादे होणे टाळले. त्यामुळे तूर्तास तरी योगींना अभय मिळाले आहे. मात्र तरीही योगींच्या खुर्चीला असलेला धोका पूर्णपणे टळलेला नाही. अमित शहा यांचे खासम्खास असलेले उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्या यांनी अचानक खाल्लेली उचल बरेच काही सांगून जाणारी आहे. योगी आमदार, खासदार, मंत्र्यांना जुमानत नाहीत, ते प्रचंड जातीयवादी आहेत, फक्त नोकरशाहीचेच ऐकतात. नोकरशाहीकडून भाजपच्या केडरच्या लोकांची कामे होत नाहीत, हे योगींबद्दलचे प्रमुख आक्षेप आहेत. त्यामुळे योगींच्या अडचणी वाढल्या आहेत. विधानसभा पोटनिवडणुकांसाठी योगींनी दोन्ही उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांना विश्वासात न घेता काही मंत्र्यांवर या निवडणुकांची जबाबदारी सोपविली आहे. वास्तविक हे काम मुख्यमंत्र्यांचे नाही तर प्रदेशाध्यक्षांचे आहे. त्यामुळे योगींविरुद्ध सगळे असे चित्र निर्माण झाले आहे. योगींच्या समर्थनार्थ दयाशंकर सिंग नावाचे एक वादग्रस्त मंत्री सोडले तर कोणीच नाही. मोदी कार्यरत असताना योगींच्या पंतप्रधानपदाच्या चर्चांनी दिल्लीकर तसेही अस्वस्थ आहेतच. त्यात योगी आपल्या हेकेखोर राजकारणामुळे दिल्लीकरांना नव्या संधी उपलब्ध करून देत आहेत. राजनाथ सिंगांचा नकार व संघाने योगींची केलेली पाठराखण, यामुळे तूर्तास तरी योगींना तातडीने मठात जावे लागेल, असे दिसत नाही. मात्र महाराष्ट्रासह इतर राज्यांमधील विधानसभा निवडणुकांनंतर उत्तर प्रदेशसह इतर राज्यांतील राजकारणांत मोठय़ा उलथापालथी होण्याची चिन्हे आहेत.

बिट्टू विरुद्ध चन्नी

अर्थसंकल्पीय अधिवेशनात नव्याकोऱया संसदत भवनात लोकसभेत अक्षरक्षः हाणामारीचा एक बाका प्रसंग उभा राहिला. अर्थसंकल्पावर बोलताना पंजाबचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे विद्ममान खासदार चरणजितसिंग चन्नी यांनी सरकारवर टीका करतांना काँगेसमधून भाजपमध्ये आलेले आणि लोकसभेला पराभूत होऊनही अचानक केंद्रीय मंत्री झालेल्या रवनितसिंग बिट्टू यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका केली. त्यामुळे या दोघांमध्ये हाणामारी होता होता राहिली. नरेंद्र मोदी हे शेतकरीविरोधी आहेत, असा आरोप करत चन्नी यांनी खलिस्तानी समर्थक असलेल्या अमृपालसिंग यांना सभागृहात का बोलू दिले नाही, असा सवाल केला. त्यावर बिट्टू यांनी संतापून तुम्ही देशद्रोह्यांची तळी उचलत आहात, असे सुनावले. त्याला प्रत्युत्तर देत ‘आपके दादा (माजी मुख्यमंत्री बेअंतसिंग) तो काँग्रेस के लिए शहीद हो गये, खलिस्तानीयों के खिलाफ लडते लडते’ याची आठवण करून दिली. त्यावर ‘मेरे दादाजी काँगेस के लिए नही देश के लिए शहीद हुए’ असा पलटवार बिट्टू यांनी केला. चन्नी यांनी वैयक्तिक हमला करत, ‘बेअंतसिंग उस दिन नही मरे लेकिन जब आपने बीजेपी जॉइन करी उस दिन वो मरे’ असे विधान केल्यावर बिट्टू यांचा संताप अनावर झाला. चन्नी यांना मारण्यासाठी ते थेट काँग्रेसच्या बाकाच्या दिशेने धावले. हा बाका प्रसंग ओळखून प्रसंगावधान राखत राजनाथ सिंग व राहुल गांधी यांनी दोन्ही नेत्यांना आवरले. मात्र या दोघांत हाणामारी होत असतानाही त्याला आवर घालण्याऐवजी काँग्रेसचे खासदार अमरसिंग ब्रार हे हाणामारीसाठी उत्सुक असल्याचे दिसून आले. एपंदरीत लोकसभेत एक मोठा अनर्थ होता होता टळला.

ओम बिर्लांची परीक्षा

‘घर फिरले की कसे घराचे वासे फिरतात’ याचा अनुभव सध्या लोकसभेचे सभापती ओम बिर्ला घेत आहेत. गेल्या टर्ममध्ये संपूर्ण बहुमत गाठीशी असल्याने व महाशक्तीची ताकद पाठीमागे असल्याने बिर्ला यांनी सत्ता पक्षाला अनुपूल कामकाज चालविले. बिर्लांच्या या पक्षपातीपणावर संख्याबळ नसल्याने विरोधकही हतबल होते. विरोधी पक्षांच्या खासदाराला दटावून खाली बसवणे, विरोधी खासदार बोलत असताना अचानक माईक बंद करणे हे प्रकारही त्या काळात गाजले. मात्र आता विरोधी पक्षाकडे चांगले संख्याबळ असल्यामुळे उलटी गंगा वाहायला सुरुवात झाली आहे. अर्थसंकल्पावरील चर्चेत तृणमूल काँगेसचे खासदार व ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक हे चांगले भाषण करत होते. मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणावर बोट ठेवताना त्यांनी फसलेल्या नोटाबंदीचाही उल्लेख केला. मोदींना अपयशी ठरविणाऱ्या नोटाबंदीचा उल्लेख सभापतींना खटकणे स्वाभाविकच होते. पुराणकाळातल्या गोष्टी आता काढू नका, असे बिर्लांनी अभिषेक यांना बजावले. त्यावर अभिषेक यांनी हजरजबाबीपणाने दिलेले उत्तर हे खूपच समर्पक असे होते. ‘इस सदन में 60 साल पहले लगाई गयी आणीबाणी का उल्लेख हो सकता है, उसके उपर बहस हो सकती है, लेकिन 8 साल पहले की नोटबंदी पर नही हो सकती क्या?’ असा खडा सवाल उपस्थित केला. त्यानंतर बिर्लांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. गेली पाच वर्षे सभापतीपद पुरेपूर एन्जॉय करणाऱया बिर्लांना दुसरी टर्म ही परीक्षा द्यावीच लागणार आहे, असेच दिसतेय.