>> नीलेश कुलकर्णी [email protected]
मुलायमसिंग यादवांना दिल्लीकरांनी ओबीसी मतांसाठी ‘पद्म पुरस्कार’ यापूर्वीच दिलेला असल्याने मुख्यमंत्री योगींपेक्षाही दिल्लीकरांना आजघडीला अखिलेश ‘अधिक प्यारे’ आहेत. या पोटनिवडणुकांत भाजपचा पराभव झाला तर योगींचा सगळा हिशेब चुकता होईल. लोकसभेला योगींनी जाणीवपूर्वक भाजपची खाट उभी केली होती. त्याचा बदला पूर्ण होईल. त्यामुळेच पोटनिवडणुकीच्या पोटातून बदल्याच्या राजकारणाचे आवाज येताहेत. ‘फटाका’ कधी व कोणाचा फुटतो ते दिसेलच!
उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या नऊ जागांवरील पोटनिवडणुकीच्या ‘निकाला’नंतर तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे काय होईल? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. योगींच्या डोक्यावर संभाव्य पराभवाचे खापर फोडून त्यांना कायमस्वरूपी गोरखनाथ पीठात पाठविण्याचे नियोजन दिल्लीकरांनी केले आहे. उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीच्या सर्वच जागा लढविण्याचा निर्धार समाजवादी पक्ष व बहेनजी मायावतींनी केला आहे, तर काँग्रेसने या निवडणुका न लढविण्याचा कधी नव्हे तो शहाणपणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये मतविभाजन फारसे होणार नाही व त्याचा फायदा समाजवादी पार्टीला होईल असे सध्याचे चित्र आहे.
देशाच्या पंतप्रधानपदाचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, असे नेहमीच म्हटले जाते. मात्र उत्तर प्रदेशसारखे भलेमोठे राज्य एकहाती ताब्यात असतानाही केवळ ‘योगी नको’ या अजेंडय़ापोटी भाजप उत्तर प्रदेश तर गमावणार नाही ना? अशी भीती राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. वास्तविक ज्याचा उत्तर प्रदेशवर होल्ड त्याचा दिल्लीवर होल्ड हे साधे गणित आहे. राममंदिर आंदोलनानंतर उत्तर प्रदेशातील भाविक जनतेने भाजपला डोक्यावर घेतले होते. मात्र त्यानंतर भाजपकडून भ्रमनिरास झाल्याने याच जनतेने अगदी आनंदाने मायावतींचे ‘ब्राह्मण-दलित सोशल इंजिनीअरिंग’ स्वीकारले. 2014 मध्ये नरेंद मोदींच्या नावाने आलेल्या लाटेने भाजपचे उत्तर प्रदेशामध्ये खऱया अर्थाने पुनर्वसन झाले. मात्र हे सगळे संचित गंगेत वाहून जाते की काय? असे म्हणण्यासारखी स्थिती आहे. नरेंद्र मोदी पुढच्या वर्षी रिटायर वगैरे होऊन ‘मार्गदर्शक मंडळी’त जातील, अशी एक शक्यता आहे. त्यामुळे ‘मोदींनंतर कोण?’ या प्रश्नाच्या पुढे अमित शहा यांना पर्याय म्हणून योगींचे नाव पुढे येत आहे. खरी गोम इथेच आहे. योगी महाराज आपल्या पंतप्रधानपदाच्या मार्गातला अडसर ठरतील म्हणून त्यांचा ‘व्यवस्थित कार्यक्रम’ करण्याचा दिल्लीकरांचा बऱयाच दिवसांपासूनचा मनसुबा आहे. मात्र तो अजून तरी यशस्वी होऊ शकलेला नाही. राज्यातील पोटनिवडणुका हे त्यासाठीचे सबळ कारण असेल. पोटनिवडणुकांत भाजपचा समजा दारुण पराभव झालाच तर त्यासाठी योगींना जबाबदार धरले जाईल. अर्थात योगींच्या काही सामाजिक व राजकीय भूमिकेमुळे उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे अतोनात नुकसान झाले हेही खरेच आहे. उत्तर प्रदेशची सत्ता फक्त ठाकुरांची आहे. ठाकुरांशिवाय तिथे कधीही कोणाचाही एन्काऊंटर होऊ शकतो किंवा त्याच्या घरादारावर बुलडोझर फिरवला जाऊ
शकतो हे नरेटिव्ह योगींचा घात करणारे आहे. मोदी-शहा जोडीला काटशह म्हणून नागपूरकरांनी योगींचे डळमळणारे आसन सध्या तरी सांभाळून धरले आहे. मात्र नागपूरचा ‘हात’ कधी सुटेल हे कोणालाच सांगता येत नाही. त्यामुळे योगी मठात जातात की दिल्लीकरांना वरताण ठरतात, हे पोटनिवडणुकीच्या निकालानंतरच कळेल.
प्रियंका गांधींचा ‘श्रीगणेशा’
प्रियंका गांधींनी आपल्या संसदीय राजकारणाचा श्रीगणेशा केला आहे. बंधू राहुल यांच्या केरळमधील वायनाड या जागेवरून त्या लोकसभेसाठी रिंगणात आहेत. या पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी सहज जिंकतील अशी स्थिती होती. मात्र त्यात डाव्यांनी नेहमीप्रमाणे खोडा घातला आहे. देशभरात ‘इंडिया’ म्हणून काँग्रेस-डावे एकत्र असले तरी केरळात हे दोन्ही पक्ष एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळेच भाकपाने त्या परिसरातले एक वयोवृद्ध व लोकप्रिय कॉम्रेड शेतकरी नेते सत्यन मोकेरी यांना वयाच्या सत्तराव्या वर्षी मैदानात उतरवले आहे. भारतीय किसान सभेत आयुष्य घालविलेले मोकेरी पूर्वाश्रमीचे आमदारही आहेत. त्यामुळे मतदारसंघात त्यांची बऱयापैकी पकड आहे. प्रियंका यांनी यापूर्वी लोकसभा निवडणुकीचे अमेठी व रायबरेलीमध्ये नियोजन केले आहे. प्रत्यक्ष निवडणूक लढविण्याचा त्यांचा हा पहिलाच अनुभव आहे. त्यामुळेच कॉंग्रेसला अधिक मेहनत घ्यावी लागत आहे. स्वतः राहुल गांधी जातीने वायनाडमध्ये लक्ष देऊन आहेत. प्रियंका सक्रिय राजकारणात येणारच नाहीत, असे म्हणणाऱयांना काही दिवसांतच त्या ‘सेंट्रल विस्टा’मध्ये दिसतील, अशीच चिन्हे आहेत.
चंद्राबाबू, स्टॅलिन आणि मोठे कुटुंब
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे प्रागतिक विचारांचे मानले जातात. त्यांच्याच कार्यकाळात हैदराबाद हे सायबर सिटी झाले. आयटीचे महत्त्वाचे केंद्र बनले. चंद्राबाबूंप्रमाणेच तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन हेदेखील पुरोगामी म्हणून ओळखले जातात. त्यांचे चिरंजीव तर सनातन धर्मही मानत नाहीत. मात्र या दोन्ही नेत्यांनी ‘विवाहित जोडप्यांनी जास्तीत जास्त मुले जन्माला घालावीत’, असे विधान करून खळबळ उडवून दिली आहे. वाढती लोकसंख्या हा केवळ देशापुढचा नव्हे तर जगापुढचा सर्वात मोठा गंभीर प्रश्न असताना चंद्राबाबू व स्टॅलिन यांच्यासारख्या सुज्ञांनी त्यावर असे व्यक्त होणे आश्चर्यकारक मानले जात आहे. चंद्राबाबू तर वाढत्या लोकसंख्येसाठी इतके उतावीळ झालेत की, दोनपेक्षा अधिक अपत्ये असतील तरच निवडणूक लढविण्यासाठी परवानगी देण्याचा नवाकोरा कायदा करण्याचा त्यांचा मानस आहे. उत्तर व मध्य हिंदुस्थानच्या तुलनेत दक्षिण हिंदुस्थानात ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे. वास्तविक दक्षिणेकडचे वातावरण व तिकडच्या राज्यांमधील आरोग्य सुविधा हे त्यामागचे कारण आहे. दक्षिणेकडे देशाच्या जन्मदरापेक्षा कमी टक्के जन्मदर आहे हे मान्य, मात्र राष्ट्रीय जन्मदर 2.2 टक्के असताना तो दक्षिणकेडे 1.6 टक्के असणे म्हणजे चीनसारखी काही ‘सिंगल चाईल्ड’ स्थिती नाही. हिंदुस्थान हा सर्वाधिक युवा देश मानला जातो. त्यामुळे लोकसंख्यावाढीची काळजी न करता चंद्राबाबू व स्टॅलिन यांनी आपले राज्य कसे पुढे नेता येईल, याची काळजी वाहिलेलीच बरी!