
>> नीलेश कुलकर्णी [email protected]
ज्यांचा शब्द गेली सत्तावीस वर्षे ओडिशात प्रमाण मानला जायचा, त्या माजी मुख्यमंत्री नवीनबाबू पटनायक यांचे ग्रह सध्या पालटलेले दिसत आहेत. वक्फ विधेयकावेळी नवीनबाबूंचा आदेश धुडकावून राज्यसभेतल्या त्यांच्या खासदारांनी सरकारच्या बाजूने मतदान करून नवीनबाबूंविरोधात बंडाचे निशाण फडकवले. नवीन पटनायक हे कायमच भाजपचे पडद्यामागचे
‘लाडके कलाकार’ राहिले आहेत. मात्र आता भाजपला पडद्यामागच्या कलाकाराची गरज राहिलेली नाही. त्यामुळे नवीनबाबूंचे काय होणार? असा प्रश्न विचारला जात आहे.
ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक हे त्यांचे वडील बिजू पटनायक यांच्या अपघाती निधनानंतर अगदी अचानकपणे राजकारणात आले. वास्तविक, त्यांना राजकारणात फारसा रसही नव्हता. अविवाहित पटनायकांचे वास्तव्य विदेशात असायचे. नवीनबाबू तसे ओडिशाच्या राजकारणात नवे होते. ओडिया ही मातृभाषाही त्यांना अवगत नव्हती. आजही नाही. मात्र तरीही त्यांनी ओडिया जनतेच्या मनावर अधिराज्य केले. मुख्यमंत्रीपद विक्रमी काळासाठी भूषविण्याचा त्यांचा पराक्रम थोडक्यात हुकला. मात्र त्यामुळे त्यांचे कर्तृत्व कमी होत नाही. नवीनबाबूंनी ओडिशाला विकासाच्या उंचीवर नेले वगैरे ठीक, मात्र त्यांनी आपल्या पक्षात कोणी मोठा होणार नाही याची कायमच काळजी घेतली. सहकारी नेत्यांपेक्षा नवीनबाबूंचा अधिकाऱयांवर जास्त भरवसा. व्ही. कार्तिकेयन पांडियन नावाच्या मूळच्या तामीळ असलेल्या आयएएस अधिकाऱयाचा गेली वीस वर्षे ओडिशाच्या राजकारणात आणि प्रशासनात सपत्नीक दरारा होता. ‘ओडिशाचा पुढचा मुख्यमंत्री दाक्षिणात्य माणूस होईल हे तुम्हाला चालेल का?’ असा प्रचार भाजपने विधानसभा निवडणुकीत केला. त्याच कार्तिकेयन प्रेमात नवीनबाबूंचे गलबत बुडाले.
‘कोण होतास तू, काय झालास तू?’ अशी अवस्था नवीन पटनायक यांची झाली आहे. वक्फ विधेयकाच्या विरोधात मतदान करण्याचा आदेश नवीनबाबूंनी दिला होता. तो दिल्लीत पोहोचता पोहोचता ‘सदसद्विवेका’त रूपांतरित झाला. राज्यसभेत आपल्या सदसद्विवेकाला जागून मतदान करा, असा आदेश राज्यसभेतील गटनेते सस्मित पात्रा यांनी दिला आणि हे महाशय मतदानाच्या आधीच आपल्या ‘सदसद्विवेकाला जागून’ विदेशात निघून गेले. प्रदीप जेना व इतर खासदारांनी वक्फच्या समर्थनार्थ मतदान केले. त्यामुळे साहजिकच भाजपचे आयतेच फावले. त्यामुळे इकडे नवीनबाबूंच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. गेली सत्तावीस वर्षे ज्यांचा शब्द हा ‘ब्रह्मवाक्य’ मानला जायचा, त्या नवीनबाबूंच्या आदेशाला केराची टोपली दाखविली गेली. व्ही. कार्तिकेयन पांडियन या अधिकाऱयाला अवास्तव महत्त्व देऊ नका, असे अनेकांनी नवीनबाबूंना सांगितले होते. मात्र पटनायक यांनी व्ही. कार्तिकेयन यांच्यावर गरजेपेक्षा अधिक विश्वास ठेवला. त्यामुळे शेवटी व्हायचे तेच झाले. सत्ता गेल्यानंतर हेच कार्तिकेयन मोठय़ा प्रमाणावर ओडिशातील संपत्ती घेऊन विदेशात पळून गेल्याचे आरोप भाजपने लावले होते. त्यात नवीनबाबूंच्या पक्षाचा निधीही या गृहस्थांनी लंपास केल्याची चर्चा आहे. कार्तिकेयन हे केंद्रीय तपास यंत्रणांच्याही रडारवर आहेत. त्यामुळे नवीनबाबूंना आहे त्या परिस्थितीला शरण जाण्याखेरीज पर्याय राहिलेला नाही. राज्यसभेतील विवादानंतर ‘शंख भवन’ या पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीतही नवीन पटनायकांच्या समोर मोठा वाद निर्माण झाला. जाहीरपणे नवीनबाबूंच्या भूमिकेला विरोध पाहायला मिळाला. साहजिकच नवीनबाबूंना आता राजकीय घरघर लागली आहे. त्यात त्यांचा पक्ष तरी अस्तित्वात राहतो की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे हे खरे.
प्रशांत किशोर यांचा ‘फुसका बार’
प्रशांत किशोर हे देशातले एक नामांकित रणनीतीकार मानले जातात. किमान ते तरी तसा दावा करत फिरत असतात. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ते नरेंद्र मोदींच्या निकट होते. मोदींनी त्यांचा वापर करून फेकून दिल्यामुळे ते नंतर नितीशबाबूंच्या जवळ गेले. नितीशबाबू त्यांना राज्यसभेवर पाठवतील, अशी अटकळ बांधली जात असताना नितीश कुमारांनी त्यांना झुलवत ठेवल्यामुळे संतापलेल्या प्रशांत किशोर यांनी राजकीय पक्षाचीच स्थापना करून टाकली. ‘गांधी मैदान से तय होगा बिहार किसका है’ अशी टॅगलाइन देऊन त्यांनी नुकतीच पाटण्याच्या गांधी मैदानात मोठी जाहीर सभा आयोजित केली होती. त्यासाठी बिहारच्या प्रत्येक गावात पोस्टर बॅनरबाजी करण्यात आली. या सभेसाठी किमान पाच लाख लोक येतील व ते येत्या विधानसभा निवडणुकीत क्रांती घडवून आणतील, असा दावा प्रशांत किशोर छातीठोकपणे करत होते. प्रत्यक्षात मैदानात 50 हजार लोकही जमा झाले नाहीत. त्यामुळे आहे त्या जनसमुदायापुढे भाषण करून प्रशांत किशोर यांना ‘सत्तापरिवर्तनाची हाक’ द्यावी लागली. एखाद्या पक्षाला बाहेर राहून सल्ला देणे सोपे असते. प्रत्यक्षात पक्ष चालविणे हे भयंकर आव्हानात्मक असते हे एव्हाना प्रशांत किशोर यांच्या लक्षात आले असेलच!
विप्लव देब यांचा ‘कॉमेडी शो’
भाजपमध्ये वाचाळ बोलणाऱयांची काही कमी नाही. मध्यंतरी शांतता दिसत असताना विप्लव देब अचानकपणे ‘प्रकटले’ आहेत. हे विप्लब देव पूर्वी अनेक खासदारांचे पीए म्हणून काम करायचे. मध्य प्रदेशचे भाजप खासदार गणेशसिंग यांचे ते अनेक वर्षे पीए होते. अचानक त्यांना लाभ झाला व 2016 मध्ये ते थेट त्रिपुराचे मुख्यमंत्रीच झाले. मात्र त्यांच्या अनेक वादग्रस्त विधानांमुळे, कारनाम्यांमुळे साडेतीन वर्षांतच त्यांची पक्षाला हकालपट्टी करावी लागली होती. ‘महाभारत काळातही इंटरनेट व सॅटेलाईट सुविधा होती’ असा शोध या विद्वान गृहस्थांनी लावला होता. हस्तिनापूरमध्ये बसलेल्या धृतराष्ट्राला महाभारताची इत्थंभूत माहिती संजयमार्फत इंटरनेटद्वारेच मिळत होती, असे अकलेचे तारे या महाशयांनी तोडले होते. नुकतेच माता त्रिपूरसुंदरी मंदिरातील सोन्याच्या दागिन्यांवर डाव्या पक्षांनी डल्ला मारल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. हे दागिने डाव्यांनी पळवले होते तर मग मुख्यमंत्री झाल्यावर त्याची चौकशी का केली नाही? असा सवाल विरोधक विचारत आहेत. भाजपचे नेते हनीमूनसाठी विदेशात जातात. मात्र डाव्या पक्षाचे लोक हनीमूनसाठी पार्टी ऑफिसमध्ये जातात, असे आणखी एक वादग्रस्त विधान करून बिप्लव यांनी आपल्या सुमार बुद्धीचे दर्शन घडविले आहे. अशाच विधानांमुळे आपले मुख्यमंत्रीपद गेले हे माहीत असूनही त्यांनी त्यापासून बोध घेतलेला दिसत नाही.