दिल्ली हादरली! मेरठ, बंगळुरु घटनेची पुनरावृत्ती, फ्लॅटमध्ये बेडच्या बॉक्समध्ये आढळला महिलेचा मृतदेह

मेरठ आणि बंगळुरु हत्याकांडानंतर दिल्लीत एक भयंकर घटना समोर आली आहे. दिल्लीच्या शाहदरा परिसरात एका फ्लॅटमध्ये बेडच्या बॉक्समध्ये महिलेचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. अंजू उर्फ अंजली (30) असे मयत महिलेचे नाव आहे. ती मूळची पंजाबची रहिवासी असून ती पतीपासून वेगळी राहत होती.

फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडून आत पाहिले असता बेडच्या बॉक्समध्ये चादरीत गुंडाळलेला मृतदेह आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

महिला पतीपासून वेगळी राहत होती. तसेच अनेक दिवसांपासून ती तिच्या आई-वडिलांच्याही संपर्कात नव्हती. पोलिसांनी आई-वडिलांना महिलेच्या मृत्यूची माहिती दिली आहे. फ्लॅट मालक विवेकानंद मिश्रा गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी दुपारी फ्लॅटमध्ये आल्याची माहिती तपासादरम्यान मिळाली. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.