मला पुन्हा मुख्यमंत्री निवासातून बाहेर काढलं, CM अतिशी यांचा केंद्रावर निशाणा

दिल्ली विधानसभा निवडणुकीची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. तसेच दिल्लीचे राजकारणही तापत आहे.  दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना देण्यात आलेल्या मुख्यमंत्री निवासाचे वाटप भाजपने रद्द केले आहे. आमचं घर हिसकावून घेतलं जात आहे. मागील तीन महिन्यांमध्ये हक्काच्या सरकारी निवासातून मला बाहेर काढण्याची ही दुसरी वेळ आहे, असा आरोप मुख्यमत्री आतिशी यांनी केला आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी भाजपवर हा आरोप केला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा मंगळवारी करण्यात आली. ज्या दिवशी दिल्ली निवडणुकीची घोषणा करण्यात येते, त्याच्या आदल्या दिवशी केंद्र सरकारने माझे सरकारी निवास, जे निवास मला मुख्यमंत्री या नात्याने देण्यात आले आहे. त्या निवासातून तीन महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा बाहेर काढलं आहे. चिठ्ठी पाठवून मुख्यमंत्री निवासाचे वाटप रद्द करण्यात आले, असा दावा आतिशी यांनी केला आहे.

जनतेने निवडून दिलेल्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांकडून मुख्यमंत्री निवास हिसकावून घेण्यात आले आहे. तीन महिन्यांपूर्वी सुद्धा त्यांनी हेच केले होते. जेव्हा मी मुख्यमंत्री झाले, तेव्हाच मुख्यमंत्री निवासातून माझे आणि माझ्या कुटुंबीयांचे सामान घरातून काढून रस्त्यावर फेकण्यात आले. भारतीय जनता पार्टीला वाटतंय की, घर हिसकावून, शिवीगाळ करून, खालच्या स्तरावरची भाषा वापरून आमची कामे बंद पडतील, पण तसे अजिबात होणार नाही, असे आतिशी म्हणाल्या आहेत.

हे आमचे घर हिसकावून घेऊ शकतात, परंतु दिल्लीच्या नागरिकांसाठी काम करण्याची आमची जिद्द हिरावून घेऊ शकत नाहीत. जर गरज पडलीच तर, मी नागरिकांच्या घरामध्ये राहीन आणि दुप्पट वेगाने काम करेन. आम्हाला कितीही त्रास द्या, परंतु दिल्लीवासियांचे काम थांबायला नको. आज मला मुख्यमंत्री निवासातून बाहेर काढलं आहे. आज मी एक शपथ घेते की, दिल्लीतील प्रत्येक महिलेला 2100 रुपये देईनच, संजीवनी योजनेअंतर्गत प्रत्येक वयस्कर व्यक्तीला मोफत उपचार देईनच. तसेच दिल्लीतील प्रत्येक पुजाऱ्याला दरमहा 18,000 रुपये मानधन देईन, असे आतिशी यांनी ठणकावून सांगितले.