दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी पत्रकार परिषदेत ढसाढसा रडल्या, भाजपच्या नेत्याची वडिलांवरून शिवीगाळ

भाजप नेते रमेश बिधुरी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांनी बाप बदलला असे वादग्रस्त विधान केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना आज भर पत्रकार परिषदेत अतिशी ढसाढसा रडल्या. बिधुरी यांनी माझ्या 80 वर्षांच्या वडिलांना शिवीगाळ केली. निवडणुकीसाठी असे घाणेरडे राजकारण करणार का? या देशाचे राजकारण इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकते, असे मला कधीच वाटले नव्हते, असे अतिशी म्हणाल्या.

माझे वडील आयुष्यभर शिक्षक राहिले आहेत. त्यांनी हजारो गरीब मुलांना शिकवले आहे. आता ते 80 वर्षांचे असून त्यांची प्रकृती इतकी गंभीर आहे की, त्यांना आधाराशिवाय चालताही येत नाही. बिधुरी आता अशा टप्प्यावर पोहोचले आहेत की ते एका वृद्धाला शिवीगाळ करून मते मागत आहेत, असे अतिशी म्हणाल्या. दिल्लीतील भाजप उमेदवार रमेश बिधुरी यांनी रविवारी दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. अतिशी यांनी बाप बदलला आहे. त्याआधी मार्लेना होत्या आता सिंह झाल्या आहेत, असे विधान बिधुरी यांनी केले होते. बिधुरी यांना कालकाजीमधून अतिशी यांच्याविरोधात तिकीट दिले आहे. काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांच्याबद्दलही बिधुरी यांनी आक्षेपार्ह विधान केले होते.

भाजप नेत्यांनी निर्लज्जपणाच्या मर्यादा ओलांडल्या

भाजप नेत्यांनी निर्लज्जपणाच्या सर्व मर्यादा ओलंडल्या आहेत, अशा शब्दांत आपचे मुख्य समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी बिधुरी यांच्या वादग्रस्त विधानावर एक्सवरून संताप व्यक्त केला आहे. भाजप नेते दिल्लीचे मुख्यमंत्री अतिशी यांना शिवीगाळ करत आहेत. महिला मुख्यमंत्र्यांचा अपमान दिल्लीतील जनता सहन करणार नाही, असे केजरीवाल म्हणाले.