स्टार्कच्या ‘पंच’ने हैदराबाद आडवा, दिल्ली कॅपिटल्सचा आणखी एक दमदार विजय

दिल्ली कॅपिटल्सने बलाढय़ समजल्या जाणाऱ्या सनरायझर्स हैदराबादचा 7 फलंदाज आणि 4 षटके राखून धुव्वा उडवित आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत आणखी एक दमदार विजय मिळविला. मिचेल स्टार्कने 5 विकेट टिपत हैदराबादला जबरदस्त ‘पंच’ लगावत आडवे केले. या लागोपाठच्या विजयासह दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या गुणतक्त्यात दुसऱया स्थानी झेप घेतली. ‘सामनावीर’ची माळ अर्थातच मिचेल स्टार्कच्या गळय़ात पडली.

हैदराबादकडून मिळालेले 164 धावांचे लक्ष्य दिल्लीने केवळ 16 षटकांत 3 बाद 166 धावा करीत सहज पार केले. जॅक फ्रेसर मॅकगर्क (38) व फाफ डय़ु प्लेसिस (50) या जोडीने 55 चेंडूंत 81 धावांची खणखणीत सलामी देत दिल्लीचा विजय सोपा केला. मॅकगर्कने 32 चेंडूंत 4 चौकारांसह 2 षटकार लगावले, तर डय़ु प्लेसिसने 27 चेंडूंत 3 टोलेजंग षटकारांसह तितकेच चेंडू सीमापार पाठविले. फिरकीपटू झिशान अन्सारीने डोकेदुखी ठरलेली ही सलामीची जोडी तंबूत पाठविली. त्याने मॅकगर्कला स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केले, तर डय़ु प्लेसिसला मुल्डरकडे झेल देण्यास भाग पाडले. मग लोकेश राहुलही केवळ 15 धावांवर बाद झाला. झिशान अन्सारीनेच त्याचा त्रिफळा उडविला. त्यानंतर अभिषेक पोरेल (नाबाद 38) व त्रिस्टन स्टब्स (नाबाद 21) यांनी 28 चेंडूंत 51 धावांची अभेद्य भागीदारी करीत दिल्लीच्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली. हैदराबादकडून झिशान अन्सारी (42 धावांत 3 विकेट) वगळता इतर फलंदाजांनी निराशा केल्याने त्यांना लढतीत कधीच पुनरागमन करता आले नाही.

स्टार्कचा गुड स्टार्ट

सनरायझर्स हैदराबादला 18.4 षटकांत 163 धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. मिचेल स्टार्कने हैदराबादची आघाडीची फळी कापून काढत दिल्लीला गुड स्टार्ट मिळवून दिला. अभिषेक शर्मा (1) पाचव्याच चेंडूंवर दुर्दैवीरीत्या धावबाद झाला. मग मिचेल स्टार्कने इशान किशन (2) व नितीश कुमार रेड्डी (0) यांना तिसऱया षटकात बाद केले. किशनने स्टब्सकडे झेल दिला, तर नितीश कुमारचा झेल अक्षर पटेलने टिपला. ट्रव्हिस हेडने 12 चेंडूंत 4 चौकारांसह 22 धावांची संक्षिप्त, पण देखणी खेळी केली. स्टार्कनेच त्यालाही यष्टीमागे राहुलकरवी झेलबाद करून हैदराबादची 4.1 षटकांत 4 बाद 37 अशी दुर्दशा केली.

अनिकेत-क्लासनचा प्रतिकार

स्टार फलंदाजांनी सजलेली आघाडीची फळी फ्लॉप ठरल्याने हैदराबादच्या धावगतीवर त्याचा विपरीत परिणाम झाला, मात्र प्रतिकूल परिस्थितीतही अनिकेत वर्मा (74) व हेन्री क्लासन (32) यांनी दिल्लीच्या गोलंदाजीचा प्रतिकार करीत पाचव्या विकेटसाठी 42 चेंडूंत 77 धावांची भागीदारी केली. अनिकेतने 41 चेंडूंत 6 चौकार व 5 षटकारांचा घणाघात केला, तर क्लासनने 19 चेंडूंत 2 षटकार व तितक्याच चौकारांसह आपली खेळी सजवली. शेवटी मोहित शर्माने क्लासनला निगमकरवी झेलबाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर अनिकेतला तळाच्या फलंदाजांची साथ मिळू न शकल्याने हैदराबादला 20 षटकेही फलंदाजी करता आली नाही. आघाडीची फळी कापून काढणाऱया मिचेल स्टार्कने शेपटालाही जास्त वळवळू दिले नाही. अभिनव मनोहर (4), कर्णधार पॅट कमिन्स (2) व विआन मुल्डर (9), हर्षल पटेल (5) यांना फलंदाजीत योगदान देता आले नाही, तर मोहम्मद शमी एका धावेवर नाबाद राहिला. दिल्लीकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 5 फलंदाज बाद केले, तर कुलदीप यादवला 3 विकेट मिळाल्या. मोहित शर्मालाही एक विकेट मिळाली.