दिल्लीत इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू, 11 जखमी

राजधानी दिल्लीच्या मुस्तफाबाद भागात आज पहाटे एक चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू, तर 11 जण जखमी झाले. 20 वर्षे जुन्या असलेल्या या इमारतीत एपूण 22 लोक होते. मृतांमध्ये इमारतीचा मालक तहसीन आणि त्याच्या पुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे. ईशान्य दिल्लीतील शक्ती विहार परिसरात ही घटना घडली. पहाटे तीन वाजताच्या सुमारास इमारत कोसळल्याची माहिती स्थानिक दयालपूर पोलिसांना मिळाली.

इमारतीच्या तळमजल्यावरील दोन ते तीन दुकानांमध्ये बांधकाम सुरू असल्याने ही घटना घडली असल्याचे वृत्त आहे. काही स्थानिकांनी या वृत्ताला दुजोरा देताना दुकानात सुरू असलेल्या बांधकामामुळेच इमारत जमीनदोस्त झाली, असे सांगितले. गटारातील सांडपाणी वर्षानुवर्षे इमारतींच्या भिंतींमध्ये झिरपत आहे. त्यामुळे भिंतींना भेगा पडू लागल्या होत्या, असे स्थानिक सलीम अली म्हणाले.

एनडीआरएफ आणि दिल्ली पोलिसांचे पथक घटनास्थळी बचावकार्यात गुंतले आहेत. स्थानिक आमदार मोहन सिंग बिश्त यांनी दिल्ली महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे इमारत कोसळली असल्याचे म्हटले. भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाचा परिणाम आहे. संबंधित इमारत धोकादायक घोषित करण्यात आली होती. मुस्तफाबादमध्ये अनेक बेकायदेशीर आणि जीर्ण इमारती आहेत, असेही बिश्त म्हणाले.

इमारतीच्या मालकासह पुटुंब ठार
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या घटनेवरून दुःख व्यक्त करताना चौकशीचे आदेश दिले. दरम्यान, जागेच्या कमतरतेमुळे अवजड यंत्रसामग्रीचा वापर करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मृतांमध्ये इमारतीचे मालक तहसीन (60), त्यांचा मुलगा नझीम (30), त्याची पत्नी शाहिना (28) आणि त्यांची तीन मुले अनस (6), आफरीन (2) आणि अफान (2) आणि मालकाची लहान सून चांदनी (23) यांचा समावेश आहे. याशिवाय दानिश (23), नावेद (17), रेश्मा (38) आणि इशाक (75) यांचा मृत्यू झाला. सहा जखमींना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.