मोदी सरकारची दडपशाही; 700 शेतकऱ्यांना अटक, आंदोलन आणखी चिघळणार

शेतमालास किमान हमीभाव (एमएसपी), नवीन कृषी कायद्यांतर्गत भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी उत्तर प्रदेशातील हजारो शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केल्यानंतर मोदी सरकारने बळाचा वापर करत दडपशाही सुरू केल्याचे समोर आले आहे. आज पोलिसांनी तब्बल 700 आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना अटक करून बसमध्ये अक्षरशः कोंबून नेण्यात आले. दरम्यान, न्याय मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकरी संघटनांनी केल्याचे शेतकरी नेते सुखबीर खलिफा यांनी म्हटले आहे. त्यामुळे आंदोलन आणखी चिघळणार आहे.

पोलिसांच्या प्रचंड फौजफाटय़ात शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तसेच काहीही झाले तरी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार बोलून दाखवला. भारतीय किसान परिषदेचे अध्यक्ष सुखबीर खलिफा यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. सुखबीर खलिफा यांनी विविध मागण्यांसाठी दलित प्रेरणा स्थळ येथे ठाण मांडून आंदोलन सुरू केले होते. त्यांचे हे आंदोलन चिरडण्यात आले. संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली भारतीय किसान परिषद, किसान मजदूर संघासह विविध शेतकरी संघटनांनी एकत्रितपणे संसद परिसरात धडक देण्याचा इशारा दिला होता.

सरकार काहीच करत नाही; उपराष्ट्रपतींनी सुनावले

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आश्वासने दिली होती का? जर दिली असतील तर ती पूर्ण का केली नाहीत, असा सवाल देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांना एका कार्यक्रमात बोलताना केला. तुमचा प्रत्येक क्षण अत्यंत जटील होत चालल्याचे सांगतानाच आश्वासने पूर्ण करण्यासाठी आपण काय करत आहोत असेही त्यांनी विचारले. शेतकऱ्यांचे आंदोलन गेल्या वर्षीही सुरू होते आणि यावर्षीही सुरू आहे. कालचक्र फिरत आहे आणि आपण काहीच करत नाही, अशा शब्दांत धनखड यांनी शेतकरी आंदोलनप्रकरणी सरकारच्या निष्क्रियतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

अटक केलेल्यांमध्ये महिलांचाही समावेश

अटक करण्यात आलेल्यांमध्ये महिला शेतकऱ्यांचाही मोठय़ा प्रमाणावर समावेश आहे. तसेच उत्तर प्रदेशातील भारतीय किसान संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पवन खतना आणि खलिफा यांसारख्या अनेक शेतकरी नेत्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या कारवाईचा शेतकरी नेते नरेश टिपैत यांनी मुझफ्फर नगर येथे आयोजित केलेल्या पंचायतीत तीव्र निषेध केला.

शेतकऱ्यांना नेण्यासाठी विविध ठिकाणांहून बसेस मागवल्या

दलित प्रेरणा स्थळ येथे शेतकरी आंदोलनाला बसल्यामुळे वाहतूक अर्धा ते पाऊण तास बंद करण्यात आली होती. शेतकऱयांना अटक करण्यासाठी नोएडा आणि ग्रेटर नोएडा डेपोतून 10 बसेस मागवण्यात आल्या. या बसेस आग्रा, फरुखाबाद आणि हरिद्वार या मार्गावर धावतात. बसेस शेतकऱयांना अटक करण्यासाठी नेण्यात आल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कारवाई

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या 170 कलमांतर्गत आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास 160 हून अधिक शेतकऱयांना ताब्यात घेण्यात आले असे कारण अतिरिक्त पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) शिव हरी मिना यांनी दिले आहे. तब्बल चार हजार पोलिसांचा फौजफाटा कारवाईदरम्यान तैनात करण्यात आला होता. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांना अटकेचे अधिकार दिल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, सर्व शेतकऱ्यांना नोएडातील लुक्सर कारागृहात ठेवण्यात आले आहे.