![kejriwal (1)](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/kejriwal-1-696x447.jpg)
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल अनपेक्षित आले आहेत. या निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवले आहे. या निकालानंतर आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जनतेचा निर्णय आम्हाला मान्य आहे. जनतेच्या निर्णयाचा आपण विनम्रतेने स्वीकार करत आहोत. या विजयाबद्दल भाजपचे अभिनंदन करताना जनतेने जो विश्वास भाजपवर दगाखवला आहे, तो सार्थ ठरवावा,अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
निकालाबाबत प्रतिक्रिया देताना केजरीवाल यांनी एका व्हिडिओ एक्सवर पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, दिल्ली निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. जनतेचा निर्णय काहीही असो, आम्ही तो पूर्ण विनम्रतेने स्वीकार करतो. जनतेचा निर्णय आम्हाला मान्य आहे. भाजपच्या विजयाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. ज्या अपेक्षेने जनतेने त्यांना बहुमत दिले आहे, त्या अपेक्षा त्यांनी पूर्ण कराव्या, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
केजरीवाल म्हणाले की, गेल्या 10 वर्षांत जनतेने आम्हाला संधी दिली. त्याकाळात आम्ही बरेच काम केले आहे. या काळात आम्ही दिल्लीचा विकास केला आहे. शिक्षण, आरोग्य, वीज आणि पाणी या क्षेत्रात बरेच चांगले काम केले आहे. आम्ही वेगवेगळ्या प्रकारे लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्लीच्या पायाभूत सुविधा सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. आता आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करणार आहोत. जनतेच्या समस्यांना वाचा फोडणार आहोत. आम्ही जनतेसोबत कायम आहोत, असेही केजरीवाल यांनी सांगितले. जनतेच्या सुख-दुःखात आम्ही नेहमीच त्यांच्यासोबत राहू. आम्ही राजकारणाला जनतेची सेवा करण्याचे माध्यम मानतो. आम्ही केवळ एका मजबूत विरोधी पक्षाची भूमिका बजावणार नाही तर समाजसेवाही करत राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आम आदमी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी निवडणूक उत्तम प्रकारे लढवली. आमच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. या काळात त्यांनी खूप काही सहन केले पण या संपूर्ण निवडणुकीत त्यांनी उत्तम कामगिरी केली. याबद्दल मी त्याचे अभिनंदन करतो, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.