दिल्लीत ‘आप’चे घोषणापत्र जारी; जनतेला दिल्या 15 गॅरंटी

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. तसेच सर्वच पक्षांकडून जनतेला विविध आश्वासने देण्यात येत आहेत. आता आम आदमी पक्षानेही आपला जाहीरनामा जारी केला असून त्यात जनतेला 15 गॅरंटी देण्यात आल्या आहेत. आपने दिलेल्या या 15 हमी पुढील ५ वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहेत. आपली हमी ही जुमला नसून पक्की बात असते. आम्ही या हमी पूर्ण करणारच, असे आश्वासन आपचे संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जनतेला दिले आहे.

आम आदमी पक्षाने सोमवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. पक्षाने दिल्लीतील जनतेला 15 हमी देण्याचे आश्वासन दिले आहे. अरविंद केजरीवाल यांनी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यांच्यासोबत दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी, सौरभ भारद्वाज आणि मनीष सिसोदिया यांच्यासह अनेक वरिष्ठ पक्ष नेते उपस्थित होते. भाजपने शनिवारी जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर सोमवारी ‘आप’ने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

केजरीवाल यांची हमी म्हणजे पक्की बात, आश्वासने पूर्ण होण्याची पक्की खात्री आहे. यात वरवरचे काहीही नाही, कोणतीही जुमलेबाजी नाही. काही लोकांचे संकल्प पत्र जारी झाले आहे. ते बनावट आहे, हे सर्वांना माहीत आहे. पहिल्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की मी प्रत्येकी 15 लाख रुपये देईन, तेव्हा दीड वर्षांनी एका मुलाखतीत अमित शहा यांना विचारण्यात आले की पंतप्रधान मोदींनी प्रत्येकी 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, तेव्हा त्यांनी सांगितले की ते फक्त एक जुमला होता. भाजपसारखे पक्ष निवडणुकीदरम्यान ज्या काही घोषणा करतात ती फक्त जुमेलबाजी असते, असा हल्लाही त्यांनी भाजपवर चढवला.

केजरीवाल यांनी पक्षाच्या जाहीरनाम्यात तरुणांना रोजगार, महिला सन्मान योजना आणि वृद्धांना मोफत उपचारांची हमी दिली. सत्तेत आल्यास विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास आणि मेट्रोच्या भाड्यात 50 टक्के सूट देण्याचे आश्वासन दिले. यासोबतच, मोफत शिक्षण, आरोग्यसेवा, महिलांसाठी बस प्रवास, पाणी आणि वीज यासह सहा विद्यमान फायदे सुरूच राहतील.

दिल्लीत आप सत्तेत आला तर पुढील 5 वर्षांत स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छ यमुना आणि चांगले रस्ते उपलब्ध करून दिले जातील, असेही त्यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, जर आप सत्तेत आले तर महिलांना दरमहा 2,100 रुपये मदत देण्यात येईल, ही आपली हमी आहे. त्याचप्रमाणे जाहीरनाम्यात रोजगार हमी, महिला सन्मान योजना, संजीवनी योजना, चुकीचे पाणी बिल माफ केले जाईल, डॉ. आंबेडकर शिष्यवृत्ती योजना, विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सेवा, दिल्ली मेट्रोमध्ये 50 सूट, पुजारी समृद्धी योजना (प्रत्येक पुजारी आणि प्रत्येक ग्रंथीला दरमहा 18,000 रुपये दिले जातील.), भाडेकरूंना मोफत वीज आणि मोफत पाण्याचा लाभ देखील मिळेल. गटार साफ करू, दिल्लीतील सर्व जुन्या सांडपाण्याच्या वाहिन्या बदलल्या जातील आणि नवीन सांडपाण्याच्या वाहिन्या टाकल्या जातील. रेशनकार्ड सुरू केले जातील, ऑटो टॅक्सी आणि ई-रिक्षा चालकांना 10 लाख रुपयांचा विमा आणि 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जाईल. दिल्लीतील सोसायट्यांमधील आरडब्ल्यूएला दिल्ली सरकार खाजगी सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यासाठी पैसे देण्यात येतील, अशी आश्वासने जाहीरनाम्यात देण्यात आली आहे.