दिल्ली विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ‘आप’चे सर्वेसर्वा आणि दोन वेळा मुख्यमंत्रीपद भूषविणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना पराभवाचा धक्का बसला. मद्य धोरणामुळे अडचणीत सापडलेले माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियाही निवडणुकीत पडले. पेंद्रातील सत्ताधारी भाजपने ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या पेंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा मागे लावून दिल्लीतील सत्ताधारी ‘आप’ सरकारला पुरते घेरले. यामध्ये मद्य धोरणाच्या आरोपामुळे खिळखिळा झालेला शीशमहल कोसळला आणि भाजपने ‘आप’चा ‘दारू’ण पराभव करत दिल्ली केजरीवालमुक्त केली. भाजपने 70 पैकी 48 जागांवर निर्विवाद बहुमत मिळवून 27 वर्षांनंतर दिल्लीची सत्ता काबीज केली. ‘इंडिया’ आघाडीचे घटक असलेले ‘आप’ आणि कॉँग्रेस या निवडणुकीत स्वबळावर रिंगणात उतरले होते. भाजपने मागील एक-दीड वर्षापासून पद्धतशीरपणे पेंद्रातील सत्तेचा वापर करून केजरीवाल यांच्या नेतृत्वातील ‘आप’ सरकारला पुरते बदनाम केले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने 70 पैकी 48 जागांवर विजय मिळवत दिल्लीची सत्ता मिळवली. तर आपला या निवडणुकीत केवळ 22 जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. आपचे अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया, सत्येंद्र जैन, अवध ओझा, सोमनाथ भारती, सौरभ भारद्वाज या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. तर कॉँग्रेसचे संदिप दिक्षित, अलका लांबा यांच्यासह भाजपचे रमेश बिधुढी, दुष्यांत गौतम यांना या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला.
‘आप’च्या अतिशी यांनी गड राखला
दिल्लीच्या कालकाजी मतदारसंघातून लढणाऱ्या ‘आप’च्या मुख्यमंत्री आतिशी यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत ‘आप’चा गड राखला. या ठिकाणी काँग्रेसकडून अलका लांबा आणि भाजपकडून रमेश बिधुरी अशी तिरंगी लढत होती. त्यात आतिशी यांनी सुमारे 2500 हून जास्त मतांनी भाजपच्या बिधुरी यांचा पराभव केला. काँग्रेसच्या अलका लांबा यांनी 4000 मतांचा टप्पाही गाठता आला नाही.
अजित पवार गटाचा धुव्वा
दिल्ली विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 30 उमेदवार दिले होते. महाराष्ट्रात महायुतीत भाजप सोबत असली तरी अजित पवार गटाने दिल्लीत वेगळे राहत निवडणूक लढविली होती. राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा गेलेला दर्जा परत मिळविण्यासाठी हा त्यांचा प्रयत्न होता. महाराष्ट्रात भाजपचा मित्रपक्ष असणाऱ्या अजितदादा गटाचा दिल्लीच्या निवडणुकीत धुव्वा उडाला.
केजरीवाल यांचा 3186 मतांनी पराभव
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा भाजपच्या प्रवेश वर्मा यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून 3 हजार 186 मताधिक्याने पराभव केला. याआधी केजरीवाल यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडणूक जिंकली होती, मात्र यावेळी भाजपचे प्रवेश वर्मा यांनी त्यांना पराभवाची धूळ चाखायला लावली. 2013 च्या निवडणुकीत केजरीवाल यांनी कॉँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा पराभव करून दिल्लीची सत्ता काबीज केली होती. 2015 मध्ये केजरीवाल यांनी 64.14 टक्के मताधिक्य मिळून ही जागा जिंकली, तर 2020 मध्ये या मतदारसंघात त्यांना 61 टक्के मते मिळाली होती. यंदाच्या निवडणुकीत नवी दिल्ली मतदारसंघात तिरंगी लढत झाली. काँग्रेसने या जागेवर शीला दीक्षित यांचा मुलगा संदीप दीक्षित यांना उमेदवारी दिली होती.
दिल्लीत महाराष्ट्र पॅटर्न दिसला – संजय राऊत
अरविंद केजरीवाल दिल्लीत दहा वर्षे सत्तेत होते. आम आदमी पक्ष आंदोलनातून आलेला पक्ष आहे. मात्र महासत्ता, पैशांच्या यंत्रणेपुढे त्यांचा निभाव लागू शकला नाही. तिथेही महाराष्ट्राचा पॅटर्न राबवला गेल्याचे दिसून आले असल्याची टीका शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी केली. कॉँग्रेस आणि ‘आप’ एकत्र आले नाहीत यामुळे हरयाणात भाजपला फायदा झाला. दिल्लीत केजरीवाल यांच्या ‘आप’चा पराभव काँग्रेस आणि ‘आप’ वेगवेगळे लढल्यामुळे झाला आहे. आमच्या ‘इंडिया’ ब्लॉकमधील दोन पक्ष एकत्र आले असते तर निकाल वेगळा लागला असता. राजकारणात अघोरी पॅटर्न काही काळ चालतो, असे संजय राऊत म्हणाले.
मुख्यमंत्रीपदासाठी प्रवेश वर्मा यांची चर्चा
भाजपच्या दणदणीत विजयानंतर आता दिल्लीत मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री पदासाठी भाजपमध्ये अनेक मोठे चेहरे आहेत. केजरीवाल यांचा पराभव करणारे प्रवेश साहिब सिंह वर्मा यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी सध्या चर्चा सुरू आहे. पाच वेळा आमदार राहिलेले मोहन सिंह बिष्ट यांनी स्वतः मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला आहे. मनोज तिवारी आणि वीरेंद्र सचदेवा यांसारखे चेहरांचा समावेश आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिबसिंह वर्मा यांचे पुत्र प्रवेश वर्मा यांचा दावा अधिक मजबूत मानला जात आहे.
काँग्रेसमुळे आपचे 14 जागांवर नुकसान
आम आदमी पक्षाच्या 14 जागांवर झालेल्या पराभवाचे अंतर काँग्रेसला मिळालेल्या मतांपेक्षा कमी आहे. आप आणि काँग्रेस एकत्र लढले असते तर इंडिया आघाडीच्या जागा 37 झाल्या असत्या आणि भाजपला 34 जागांपर्यंत मर्यादित करता आले असते. कॉँग्रेसमुळे आपचे 14 जागांवर नुकसान झाले.
यमुनेलाच दिल्लीची ओळख बनवू – नरेंद्र मोदी
भारतमाता की जय आणि यमुना मैया की जय असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली. आज दिल्लीच्या लोकांमध्ये समाधान आणि उत्साह आहे. उत्साह विजयाचा आहे आणि समाधान दिल्ली ‘आपदे’तून मुक्त झाल्यामुळे आहे. यमुनेलाच दिल्लीची ओळख बनवू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
मोदीच्या गॅरंटीवर विश्वास ठेवला. मी दिल्लीकरांचे मनापासून आभार मानतो, दिल्लीने मनापासून आमच्यावर प्रेम केले. दिल्लीकरांना मी हा विश्वास देऊ इच्छितो की, तुमचे प्रेम विकासाच्या रूपाने तुम्हाला परत देऊ. दिल्लीकरांनी आम्हाला प्रेम दिले, विश्वास दाखवला. हे कर्ज दिल्लीचे डबल इंजिन सरकार चुकवणार असल्याचे मोदी दिल्ली विधानसभा निवडणुकीतील यशाच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले.
दिल्लीच्या एनसीआरमध्ये प्रगती
दिल्लीतील लोक तुटलेले रस्ते, कचऱ्याचे ढीग, गटारांचे पाणी ओव्हरफ्लो आणि प्रदूषित हवेमुळे त्रस्त आहेत. आता येथील भाजप सरकार विकासाच्या ऊर्जेने दिल्लीला आधुनिक शहर बनवेल. पहिल्यांदाच दिल्ली-एनसीआरच्या प्रत्येक राज्यात भाजप सत्तेत आली आहे. यामुळे दिल्ली आणि संपूर्ण एनसीआरमध्ये प्रगतीचे असंख्य मार्ग खुले होणार आहेत, असे मोदी म्हणाले.
अण्णांना वेदनेतून आराम
‘आप’दाचे लोक राजकारणात बदल घडवून आणतील असे म्हणत राजकारणात आले, पण ते अत्यंत बेईमान निघाले. अण्णा हजारे यांचे विधान ऐकत होतो. ते बऱ्याच काळापासून या ‘आप’दा लोकांच्या दुष्कृत्यांचे परिणाम भोगत आहेत. आज त्यांनाही त्या वेदनेतून आराम मिळाला असेल, असा टोला मोदी यांनी लगावला.
काँग्रेसला एकही जागा नाही, पण मतांमध्ये 2 टक्के वाढ
दिल्ली विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही. 2020 च्या निवडणुकीच्या तुलनेत कॉँग्रेसच्या मतांमध्ये यावेळी 2 टक्यांची वाढ झाली. भाजपच्या मतांच्या टक्केवारीत 9 टक्यां पेक्षा जास्त वाढ झाली. आम आमदी पार्टीला मागील निवडणुकीपेक्षा 10 टक्यांपेक्षा अधिक मतांचा फटका या निवडणुकीत बसल्याचे दिसून आले.
तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्याभोवती मद्य घोटाळय़ाचा फास आवळला. त्यात ईडीपासून इतर तपास यंत्रणांची एंट्री झाली. ‘आप’’चे अनेक दिग्गज तुरुंगात गेले. त्यात केजरीवाल यांचासुद्धा क्रमांक लागला.
निवडणुकीचा बिगुल वाजताच गृह मंत्रालयाने केजरीवाल आणि सिसोदियांविरोधात खटला चालवून ‘आप’ला पुरते घेरले.
मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान शीशमहल ते मद्य घोटाळय़ापर्यंतचे मुद्दे प्रभावीपणे मांडत केजरीवाल यांच्या विरोधात जनमत तयार केले.
जनतेने दिलेला ल आम्ही नम्रपणे स्वीकारतो. आता आम्ही विरोधी पक्षाची भूमिकाही चोखपणे बजावू, आम्ही लोकांची सेवा करत राहू. लोकांच्या सुखात आणि दुःखात त्यांच्याबरोबर राहू. कारण आम्ही राजकारणात फक्त सत्तेसाठी आलेलो नाही. अरविंद केजरीवाल, माजी मुख्यमंत्री
ओमर अब्दुल्लांनी सुनावले भांडत बसा, एकमेकाला संपवा!
‘दिल्लीतील पराभवानंतर जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी संताप व्यक्त करताना काँग्रेस आणि ‘आप’वर जोरदार टीका करताना रामायणातील एक व्हिडीओच ‘एक्स’वर शेअर केला आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि ‘आप’ एकमेकांविरोधात लढले होते. ‘आपापसात मनसोक्तपणे भांडा आणि एकमेकांना संपवून टाका,’, असा संताप व्यक्त करणाऱ्या ऋषींचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आप आणि काँग्रेसने इंडिया आघाडीपासून लांब होत स्वतंत्र निवडणूक लढवल्याने हा पराभव झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अण्णा जागे झाले… म्हणे नाइलाजाने विरोधात बोललो!
गेल्या अनेक दिवसांपासून गप्प असणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ‘आप’च्या पराभवानंतर मात्र बोलू लागले. ‘आम्ही एवढं प्रेम तुमच्यावर केलं, पण तुम्ही रस्ता सोडून गेलात. त्यामुळेच तुमच्या विरोधात नाइलाजास्तव बोलावे लागले’, असे अण्णा म्हणाले. केजरीवालांना अनेक गोष्टी शिकवल्या, मात्र त्यांनी समाजाचा विचार केला नाही आणि राजकारण केल्याचे सांगताना अण्णांच्या डोळय़ात पाणीही आले. ऐन निवडणुकीच्या दिवशी अण्णांनी केजरीवालांना स्वार्थी संबोधून त्यांच्या पक्षाला मतदान करू नये, असेही म्हटले होते.