दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा; 5 फेब्रुवारीला मतदान, 8 तारखेला निकाल

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार असून 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर मतमोजणी 8 फेब्रुवारीला होणार आहे आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे. तसेच ईव्हीएमवरील आरोंपानाही निवडणूक आयोगाने उत्तर देत सर्व आरोप खोडून काढले आहेत.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार विधानसभा निवडणुकीची अधिसूचना 10 जानेवारी रोजी निघणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी आहे. उमेदवारी अर्जांची छाननी करण्याची तारीख 18 जानेवारी आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी असेल. त्याचप्रमाणे 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर 8 फेब्रुवारीला मतमोजणी होत निकाल जाहीर होणार आहेत.

दिल्ली विधानसभेच्या एकूण 70 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) भाजप आणि काँग्रेसला धोबीपछाड देच जबरदस्त विजय मिळवला होता. या निवडणुकीत आपने 70 पैकी 62 जागांवर विजय मिळाला होता. तर भाजपला अवघ्या 8 जागांवर विजय मिळाला होता. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये ‘आप’ने दिल्लीत वर्चस्व राखले होते. दिल्लीत बहुमतासाठी 36 ही मॅजिक फिगर आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया यांच्यासह ‘आप’च्या प्रमुख नेत्यांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पक्षाची प्रतिमा काही प्रमाणात डळमळीत झाली आहे. याशिवाय, सलग 10 वर्षे सत्तेत असल्यामुळे सत्ताधारी’आप’ विरोधात अँटी-इन्कम्बन्सी फॅक्टर निर्माण झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

प्रत्येक निवडणुकीनंतर ईव्हीएमवर आरोप होतच राहतात. कुठल्याही यंत्रणेनं ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही. यंत्रणात चूक असेल, वैयक्तिक चूक असेल तर दाखवा, तत्काळ कारवाई करू, असेही केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी स्पष्ट केले. ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही, असे न्यायालयानेही म्हटले आहे. त्यामुळे वायरस किंवा इतर यंत्रणांनी ईव्हीएम हॅक होऊ शकतो हा दावा पूर्णतः खोटा आहे. निवडणुका पारदर्शक वातावरणात घेण्याला प्राधान्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.