ईडीच्या धाडी पडल्याच्या पार्श्वभूमीवर प्रचंड धसका घेतलेल्या दिल्ली सरकारमधील परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांनी पदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला आहे. आज सकाळी त्यांनी आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहून राजीनामा जाहीर केला. आम आदमी पार्टीचा बराच वेळ केंद्र सरकारशी लढण्यात गेला. पक्षाने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, असा आरोप करत गेहलोत यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
हे भाजपचे घाणेरडे षडयंत्र असून दिल्लीत होणाऱया विधानसभा ईडी आणि सीबीआयच्या जोरावर भाजपला जिंकायची आहे, असा आरोप करत दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांनी गेहलोत यांचा राजीनामा स्वीकारला. गेहलोत यांची ईडीकडून चौकशी सुरू होती. त्यामुळे त्यांच्याकडे भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय उरलेला नसून भाजप घाणेरडे राजकारण करत असल्याचा आरोप आपच्या नेत्यांनी केला आहे. गेहलोत यांच्या घरांवर, ठिकाणांवर ईडी तसेच आयटीने अनेकदा धाडी टाकल्या. ते पाच वर्षे दिल्ली सरकारचा भाग होते. भाजपने त्यांच्याविरोधात सातत्याने षडयंत्र रचले आणि त्यांच्यापुढे भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय ठेवला नाही, असा आरोप आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी केला आहे. दिल्ली निवडणुकीपूर्वी मोदी वॉशिंग मशीन सक्रिय झाले आहे. आता या मशीनच्या माध्यमातून अनेक नेत्यांचा भाजपमध्ये समावेश होणार आहे, असा टोलाही संजय सिंह यांनी लगावला आहे.
कैलाश गेहलोत यांनी 2015 मध्ये आम आदमी पार्टीत प्रवेश केला. 2017 मध्ये ते कॅबिनेट मंत्री झाले. पेशाने वकील असलेल्या गेहलोत यांनी राजकारणात येण्यापूर्वी दहा वर्षे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात अनेक मोठे खटले लढवले.