राष्ट्रपती भवनात घुमले शाहरूखच्या चित्रपटातील गाण्याचे सूर; इंडोनेशियाच्या प्रतिनिधी मंडळानं गायलं ‘कुछ कुछ होता है’ गाणं

हिंदुस्थान 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. दिल्लीतील कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाचा सोहळा सुरू असून इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यंदाच्या सोहाळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत. शनिवारी त्यांचे दिल्लीमध्ये आगमन झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्यासाठी राष्ट्रपती भवनामध्ये खास मेजवाणीचे आयोजन केले होते. या मेजवाणीसाठी प्रबोवो सुबियांतो यांच्यासह त्यांचे प्रतिनिधी मंडळही पोहोचले. तिथे त्यांनी बॉलिवूड गाणे गात उपस्थितांचे मन जिंकले.

इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्यासोबत आलेल्या प्रतिनिधी मंडळाने शाहरूख खानच्या चित्रपटातील ‘कुछ कुछ होता है’ हे गाणे गायले. या प्रतिनिधी मंडळामध्ये इंडोनेशियाचे वरिष्ठ मंत्र्यांचाही समावेश आहे. मेजवाणी सुरू असताना त्यांनी हे गाणे गायले. यावेळी राष्ट्रपती भवनामध्ये उपस्थिती लोकांनी टाळ्या वाजवत याचा आनंद लुटला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.