कार्तिकी एकादशीनिमित्त भक्तांच्या सेवेसाठी देहूनगरी सज्ज, मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यावर प्रशासनाचा भर

आळंदीच्या कार्तिकी यात्रेस प्रारंभ झाला असून, 28 नोव्हेंबर रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळा पार पडणार आहे. त्यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी, भाविक- भक्तांच्या दिंड्या आळंदीबरोबरच श्री क्षेत्र देहूगावातही दाखल होत आहेत.

खांद्यावर वैष्णव धर्माची भगवी पताका आणि मुखी ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जप करत, टाळ-मृदंगांचा गजर करीत मुख्य मंदिरात प्रदक्षिणा घालत तसेच श्री संत तुकोबारायांचे दर्शन घेऊन वारकरी भाविक भक्तिरसात तल्लीन झाले आहेत. श्री संत तुकोबारायांचे दर्शन घेण्यासाठी तासन्तास रांगेत वारकरी उभे राहत आहेत. पवित्र अशा इंद्रायणी नदीच्या काठावर वारकऱ्यांची गर्दी झाली आहे. कडाक्याची थंडी पडली असतानादेखील अगदी भल्या पहाटेपासून वारकरी इंद्रायणी नदीच्या घाटावर स्नान करून दर्शनासाठी जात आहेत.

वारकरी, भाविक भक्तांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी देहू संस्थान आणि देहू नगरपंचायतीच्या वतीने तयारी पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांनी दिली. प्रशासनातर्फे वारकऱ्यांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आली आहे. मंदिर परिसर, इंद्रायणी नदी घाट परिसर व महाद्वार चौक ते चौदा टाळकरी कमान, आंबेडकर चौक ते गाथा मंदिर रस्त्याची साफसफाई करण्यात आली आहे. 24 तास विद्युत पुरवठा चालू राहील, याची दक्षता घेण्यात आली आहे. इंद्रायणी घाटावर महिलांसाठी तात्पुरत्या स्वरूपात चेंजिंग रूम तयार करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी फिरती शौचालये उपलब्ध करून देण्यात आली असून, याची भाविकांना माहिती व्हावी, यासाठी ठिकठिकाणी दिशादर्शक व स्थळदर्शक फलकही लावले आहेत. देवस्थानच्या वतीने वारकऱ्यांसाठी भोजनव्यवस्था करण्यात आली आहे. अग्निशमन दल सज्ज असून, नदीला पाणी असल्याने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी घाटावर वावरताना काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पोलिसांच्या साहाय्याने वाहतूक नियोजन केले जाणार आहे. तर, मंदिरात व गावातील चौकाचौकांत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. देहूगाव ते निगडी, देहूगाव ते आळंदी या मार्गावर पीएमपीएलच्या जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. चार ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे, औषधोपचार केंद्रे उभी करण्यात आली आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने गावातील हॉटेल व पाण्याची तपासणी करण्यात येणार आहे.

आळंदीबरोबरच श्री क्षेत्र देहूगाव येथेही राज्याच्या कानाकोपऱ्यातून श्री संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी, भाविक येत असतात. या भाविकांना वारीदरम्यान कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी प्रशासनाने कामाला गती दिली आहे.
निवेदिता घार्गे, मुख्याधिकारी देहू