पीओके अर्थात पाकव्याप्त कश्मीर हा हिंदुस्थानचा अविभाज्य घटक असून पीओकेशिवाय जम्मू-कश्मीर अपूर्ण असल्याचे सांगताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज दहशतवादाच्या मुद्दय़ांवरून पाकिस्तानला फटकारले. पाकिस्तानसाठी पीओके ही परकीय भूमी आहे. ते केवळ दहशतवाद पसरवण्यासाठी या भूमीचा वापर करतात. येथे दहशतवाद्यांसाठी प्रशिक्षण शिबिरे चालवली जात आहेत, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. ते अखनूर येथे नवव्या सशस्त्र सेना व्हेटरन्स डेच्या कार्यक्रमात बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, हिंदुस्थानने 1965 मध्ये अखनूरमध्ये झालेल्या युद्धात पाकिस्तानी लष्कराचे सर्व प्रयत्न हाणून पाडले होते. आतापर्यंतच्या सर्व युद्धांमध्ये पाकिस्तानचा पराभव झाला आहे. 1965 पासून पाकिस्तानने अवैध घुसखोरी आणि दहशतवाद्यांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. अनेक मुस्लिम बांधवांनी दहशतवाद्यांचा सामना करताना आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. आजही हिंदुस्थानात घुसणारे 80 टक्केहून अधिक दहशतवादी पाकिस्तानातूनच येतात. दरम्यान, यावेळी राजनाथ सिंह यांनी 108फूट उंचीचा तिरंगा फडकावला.
z ‘माजी सैनिकांनी देशासाठी सर्वस्व अर्पण केले असून त्यांनी हिंदुस्थानच्या सुरक्षेसाठी त्यांच्या भवितव्याची आणि जिवाची पर्वा न करता बलिदान दिले. त्यामुळे आता माजी सैनिकांची सेवा करण्याची जबाबदारी आमची आहे. त्यांना आरामदायी जीवन देणे हे आमचे कर्तव्य असून असे केल्यानेच त्यांच्या कर्जाची परतफेड होऊ शकेल,’ असे जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी नमूद केले.
माजी सैनिकांसाठी घरोघरी वैद्यकीय सुविधा
दुर्गम भागातील माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी वैद्यकीय सुविधा घरोघरी पोहोचवण्याची घोषणा राजनाथ सिंह यांनी केली. ‘मेडिकल मोबाईल युनिट’ अर्थात फिरता दवाखाना या माध्यमातून ही सेवा पुरवली जाईल. यास थोडा वेळ लागला तरी ही सेवा नक्कीच घरोघरी पुरवली जाईल. माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. तसेच जम्मू-कश्मीर आणि उर्वरित देशामधील अंतर कमी करण्यासाठी आमचे सरकार प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला या दिशेने पावले टाकत आहेत. माझ्या हृदयात अखनूरला दिल्लीसारखे स्थान आहे हे व्हेटरन्स डेच्या या कार्यक्रमावरून सिद्ध होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.