मीरा रोडमध्ये भाजपच्या माजी नगरसेविकांचा जोरदार राडा; एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, पतंगाचा स्टॉल लावण्यावरून हाणामारी

मीरा रोडमध्ये भाजपच्या माजी नगरसेविका दीप्ती भट व हेतल परमार यांच्यात पतंगाचा स्टॉल लावण्यावरून जबरदस्त राडा झाला. एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली. हा वाद एवढा विकोपाला गेला की भट व परमार यांनी एकमेकींच्या अक्षरशः झिंज्या उपटल्या. या फ्री स्टाईल हाणामारीची भाईंदरच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असून दोघांविरुद्ध परस्पर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मीरा रोडमधील भाजपच्या माजी नगरसेविका हेतल परमार यांच्या जवळचे असलेले दीपेन व्होरा यांना शांतीनगर येथील स्वामीनारायण मंदिराजवळ पतंग व मांजाचा स्टॉल लावायचा होता. त्यासाठी त्यांनी महापालिकेची रीतसर परवानगीही घेतली. दीपेन व्होरा हे स्टॉल लावण्यासाठी मंदिराजवळ गेले असताना तेथील काही फेरीवाल्यांनी त्यांना अडवले. एवढेच नव्हे तर तुम्हाला आम्ही स्टॉल लावू देणार नाही अशी दमबाजी केली. विशेष म्हणजे या फेरीवाल्यांकडून भाजपच्या माजी नगरसेविका दीप्ती भट या हप्ता वसूल करीत असल्याचा आरोप होत आहे.

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

दीपेन व्होरा व स्वामीनारायण मंदिराजवळ आधीपासूनच बसलेले फेरीवाले यांच्यात जोरदार बाचाबाची होत असल्याचे समजताच भाजपच्या माजी नगरसेविका हेतल परमार व दीप्ती भट तातडीने दाखल झाले आणि दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली. दीप्ती भट यांचे पती शेखर भट हेदेखील घटनास्थळी आले होते. पतंगाचा स्टॉल लावण्यावरून झालेला वाद एवढा विकोपाला गेला की दीप्ती भट व हेतल परमार या दोन माजी नगरसेविकांमध्ये अक्षरशः हाणामारी झाली. दोघींनी एकमेकींच्या झिंज्या उपटल्या. हा वाद अखेर पोलीस ठाण्यात गेला असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.