
जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेते दीपक पुनिया आणि अंतिम पंघाल यांचा यांना 25 ते 30 मार्च दरम्यान अम्मान, जॉर्डन येथे होणाऱ्या आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी हिंदुस्थानी संघात स्थान मिळालं आहे. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाद्वारे (WFI) आयोजित निवड चाचणीद्वारे पुरुषांच्या फ्रीस्टाइल, ग्रीको-रोमन आणि महिला कुस्तीमध्ये प्रत्येकी 10 कुस्तीपटूंची निवड करण्यात आली. अशी एकूण 30 कुस्तीपटूंची ही टीम असणार आहे.
2019 च्या जागतिक स्पर्धेत रौप्य आणि 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या दीपक पुनिया याने वजन वाढवलं असून तो 86 किलो वजनी गटाऐवजी आता 92 किलो वजनी गटात खेळणार आहे. त्याचबरोबर विशाल कालीरामन आता 65 किलोऐवजी 70 किलोमध्ये स्पर्धा करणार आहे. अंतिम पंघाल (53 किलो) आणि रितिका (76 किलो) यांनी आपापल्या गटात चाचण्या जिंकून संघात स्थान मिळवलं आहे.