गंभीर घोटाळ्यांचा तपास करणाऱ्या कार्यालयाने (एसएफआयओ) चौकशीच्या वेळा बदलाव्यात व कार्यालयीन वेळेतच संशयितांची चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे.
आयसीआयसीआय बँक घोटाळ्यातील आरोपी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांनी ही याचिका केली आहे. कार्यालयीन वेळेतच आरोपींची चौकशी ईडीने करावी, असे आदेश नुकतेच न्यायालयाने दिले आहेत. या आदेशाचा आधार घेत व्यावसायिक दीपक कोचर यांनी ही याचिका केली आहे. चौकशीच्या नावाखाली तासन्तास कार्यालयात बसवून ठेवले जात असल्याचा आरोपही कोचर यांनी याचिकेत केला आहे.
न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. रोहित जोशी यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. कोचर यांना कार्यालयीन वेळेनंतर चौकशीसाठी बसवून ठेवले जाणार नाही, अशी हमी एसएफआयओने न्यायालयात दिली. पुढच्या सुनावणीपर्यंत कोचर यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई करू नये, असे अंतरिम आदेशही न्यायालयाने एसएफआयओला दिले आहेत. या याचिकेचे प्रत्युत्तर सादर करण्यासाठी एसएफआयओने न्यायालयाकडे वेळ मागितला.
खंडपीठाने तीन आठवड्यांची मुदत दिली. अटकेची भीती तपास यंत्रणा खूप वेळ चौकशी करत असल्यास याने नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येते. दीपक कोचर हे ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना सकाळपासून रात्रीपर्यंत चौकशीसाठी बसवून ठेवणे योग्य नाही. कदाचित एसएफआयओ दीपक कोचर यांना अटक करू शकते, अशी भीती वरिष्ठ वकील अमित देसाई यांनी व्यक्त केली.
काय आहे प्रकरण
व्हिडीओकॉन कंपनीला आयसीआयसीआय बँकेने तब्बल 3200 कोटींचे कर्ज दिले होते. यात घोटाळा झाल्याचा आरोप आहे. एसएफआयओकडून याची चौकशी सुरू आहे. दीपक कोचर यांना तपास यंत्रणेने चौकशीसाठी बोलावले व सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्री पावणेअकरापर्यंत बसवून ठेवले. तपास यंत्रणेने दिलेली ही वागणूक चुकीची असून एसएफआयओने चौकशीची वेळ बदलावी, अशी मागणी दीपक कोचर यांनी याचिकेत केली आहे.