मेधा कुलकर्णीच पत्र, धीरज घाटेंचे उत्तर; दीनानाथवरून भाजपमधील कोल्ड वॉर चव्हाटय़ावर

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पैशांअभावी उपचार नाकारल्याने एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याने रुग्णालयाच्या विरोधात पुण्यात संतापाची लाट उसळली. भाजपच्या महिला मोर्चानेदेखील रुग्णालयाच्या विरोधात आक्रमक आंदोलन करताना डॉ. घैसास क्लिनिकची तोडपह्ड केली. या प्रकरणावरून शहर भाजपमध्ये असलेले कोल्ड वॉर समोर आले आहे.

भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी या आंदोलनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करणारे आणि भाजप कार्यकर्त्यांना सोम्या गोम्या म्हणत टीका करणारे पत्र शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पाठवले. धीरज घाटे यांनी आंदोलनकर्त्या महिलांची भूमिका योग्यच असल्याचे म्हटले आहे. असे कोणतेही पत्र माझ्यापर्यंत आलेले नाही. ते मी वाचलेले नाही. प्रसार माध्यमांच्या माध्यमातून ही माहिती मला मिळाली. त्यामुळे जे पत्र मला मिळाले नाही, जे पत्र मी वाचले नाही, त्याबाबत अधिक बोलणे योग्य ठरणार नाही असे घाटे म्हणाले. मात्र यावरून शहर भाजपमध्ये असणारी खदखद बाहेर आली. त्याचबरोबर वादालाही तोंड फुटले आहे.

आमच्या पक्षाच्या महिला मोर्चाच्या हर्षदा फरांदे आणि त्यांच्या टीमने केलेले आंदोलन स्वाभाविक होते. त्यात काही चुकीचे होते, असे मला वाटत नाही. या प्रकरणांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील योग्य ती भूमिका घेतली आहे. ही झालेली घटना दुर्दैवी असल्याने त्याविरोधात निषेध करणे चुकीचे नसल्याचे धीरज घाटे यांनी सांगितले.