म्हाडाच्या घरासाठी विभक्त जोडप्यांना डिक्री प्रमाणपत्र बंधनकारक

म्हाडाच्या घरासाठी अर्ज करणाऱ्या विभक्त जोडप्यांना यापुढे डिक्री प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असणार आहे. त्या दृष्टीने म्हाडाने आपल्या ऍप तसेच संगणकीय प्रणालीमध्ये आवश्यक ते बदलदेखील केले आहेत. लवकरच जाहीर होणाऱ्या मुंबई मंडळाच्या सोडतीपासून ही नवी नियमावली लागू होणार आहे, अशी माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.

म्हाडाच्या सोडतीसाठी अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च असे विविध उत्पन्न गट असतात. आपण कोणत्या उत्पन्न गटात मोडतो त्यानुसार अर्जदारांना घरासाठी अर्ज करावे लागतो. अर्ज करताना पती आणि पत्नी यांचे एकत्रित कौटुंबिक उत्पन्न ग्राह्य धरले जाते. काही अर्जदार दोघांपैकी एकाचेच उत्पन्न दाखवून घरासाठी वेगवेगळे अर्ज सादर करतात. लॉटरीमध्ये घर लागल्यानंतर एकत्रित कौटुंबिक उत्पन्न लपविण्यासाठी आम्ही विभक्त आहोत, कोर्टात केस सुरू आहे अशी उत्तरे देऊन म्हाडाची दिशाभूल केली जाते.

 गतवर्षी 77 प्रकरणे उघडकीस

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या मुंबई मंडळाच्या सोडतीमध्ये अशी तब्बल 77 प्रकरणे म्हाडाच्या निदर्शनास आली होती. अशा दिशाभूल करणाऱ्या अर्जदारांवर म्हाडाने कारवाई केली आहे. तसेच असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी म्हाडाने विभक्त जोडप्यांना आता डिक्री प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले आहे.