
गेल्या चार वर्षांत पहिल्यांदाच कॅनडा, अमेरिका आणि यूके या तीन प्रमुख देशांमधील विद्यापीठांमध्ये जाणाऱ्या हिंदुस्थानी विद्यार्थ्यांची संख्या एकाच वेळी कमी झाली आहे. ताज्या व्हिसा क्रमांकांच्या विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे. 2024 मध्ये कॅनडा, अमेरिका आणि यूके या प्रमुख ठिकाणी अभ्यास परवाने मिळवणाऱ्या हिंदुस्थानी विद्यार्थ्यांमध्ये किमान 25 टक्क्यांची घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसून आलेय.
इमिग्रेशन, रिफ्युजीज अँड सिटिझनशिप कॅनडा (आयआरसीसी) नुसार, कॅनडामध्ये 32 टक्के घट झाली, परवाने 2.78 लाखांवरून 1.89 लाखांवर आले. अमेरिकेत 2023 ते 2024 या आर्थिक वर्षात एफ1 व्हिसाची संख्या 1,31,000 वरून 86,110 पर्यंत घसरून 34 टक्के घट झाली. त्याचप्रमाणे यूकेमध्ये 26 टक्के घट झाली. यूके होम ऑफिसच्या आकडेवारीनुसार, हिंदुस्थानींना दिलेल्या प्रायोजित विद्यार्थी व्हिसाची संख्या 1 लाख 20 हजारांवरून 88 हजार 732 पर्यंत कमी झाली.
कॅनडा आणि यूकेमध्ये स्थलांतरितांवर लावलेले उपाय कडक करण्यात आले आहेत. याअंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर मर्यादा आणि व्हिसावर निर्बंध लादले आहेत. कॅनडाने अलीकडेच हिंदुस्थानी विद्यार्थ्यांवर परिणाम करणारे अनेक निर्बंध लागू केले आहेत.
स्थलांतरितांना निर्बंध
कॅनडाने फास्ट-ट्रक स्टुडंट डायरेक्ट स्ट्रीम प्रोग्राम बंद करणे आणि 2026 पर्यंत स्थलांतरितांची संख्या 5 टक्क्यांपर्यंत कमी करणे असे धोरण ठरवले आहे. 2024 मध्ये कॅनडाने अभ्यास परवान्यांवर मर्यादा आणली, ज्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या संख्येत 35 टक्के घट झाली. 2025 साठी आणखी 10 टक्के कपात जाहीर करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्याने गृहनिर्माण, आरोग्य सेवा आणि इतर सार्वजनिक सेवांवर ताण पडत असल्याचे कॅनडा सरकारचे म्हणणे आहे.