गणेशोत्सव अवघ्या एका महिन्यावर आला असून गणपती मूर्ती कारखान्यांमध्ये लगबग सुरू आहे. मूर्तीचे काम पूर्ण झाले असून मूर्तीना रंगकाम करण्यात कारागीर व्यस्त असून मूर्तिकारांचे लक्ष बाप्पाच्या डोळ्यांवर खिळले आहे. सुबक आखणी, हिरे, मोती वापरून मूर्तीला सजवण्यात मूर्तिकार गढून गेले आहेत.
दिवस कमी, कारागिरांची कमतरता, विजेचा लपंडाव कारखानदारांना सतावत असल्याने कारखान्यांमध्ये दिवस-रात्र काम सुरू आहे. गणेशभक्तांनी आपल्याला हव्या असलेल्या मूर्तीची आगावू नोंदणी कारखानदारांकडे केली आहे. 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होणार आहे. मागील तीन महिन्यांपासून कारखान्यांमध्ये गणपती मूर्ती तयार करण्याचे काम सुरू आहे. जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत गणपतीच्या कच्च्या मूर्ती तयार करून त्या सुकवण्याचे काम करण्याकडे कारखानदारांनी लक्ष दिले. सद्यस्थितीत कारखान्यांमध्ये कच्च्या मूर्तीना रंगकाम करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कच्च्या मूर्तीना रंग देण्याबरोबरच सुबक नेट-नेटकी आखणी करण्याकडे मूर्तिकारांचे बारीक लक्ष आहे. याचबरोबर रंगकाम पूर्ण झाल्यानंतर हिरे, मोती, झिंग वापरून मूर्तीला आकर्षक बनवण्यात येत आहे. उत्सव एक महिना शिल्लक राहिल्याने वेळेत काम पूर्ण करण्याचे आव्हान कारखानदारांसमोर आहे.
कुशल कारागिरांची कमतरता
पेण वगळता इतर भागात केवळ गणपती उत्सवापूर्वी चार महिनेच गणपती मूर्ती तयार करण्याचे काम केले जाते. आठ महिने काम नसल्याने जिल्ह्यातील कारागीर या व्यवसायाकडे पाठ फिरवू लागले आहेत. काही कारागीर केवळ छंद म्हणून हे काम करतात. यामुळे कारखानदारांना कुशल कारागिरांची कमतरता भेडसावत आहे. कुशल कारागिरांची मजुरीही वाढली आहे. रंगकाम, आखणी तसेच इतर कामे करण्यासाठी एका मूर्तीसाठी 500 ते 700 रुपये कारखानदारांना मोजावे लागत असल्याची माहिती मूर्तिकार संतोष पाटील आणि संकेत भगत यांनी दिली.
– रायगड जिल्ह्यात चार ते पाच तास वीज गायब असते. यामुळे कारखानदारांसमोर मूर्ती रंगकाम करताना अडचणी येत आहेत.
– जिल्ह्यात एक फुटापासून ते आठ फुटांपर्यंत गणपती मूर्ती बनवण्यात आल्या आहेत. जवळपास 70 टक्के गणेशभक्तांची मागणी दोन ते अडीच फुटांपर्यंतच्या मूर्तीना आहे.