परभणी जिल्ह्यात महाविकास आघाडीचे चार उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी सभा घेतली. या सभेसाठी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. या सभेत उद्धव ठाकरे यांनी महायुतीच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल केली. महायुती सरकार राज्यातील प्रकल्प गुजरातला पाठवत आहे. राज्यातील रोजगार गुजरातला जात आहेत. त्यामुळे महायुती म्हणजे महाराष्ट्राची अधोगती आणि गुजरातची प्रगती असा भीमटोला उद्धव ठाकरे यांनी महायुतीला लगावला.
परभणीत आल्यावर होमपिचवर आल्यासारखे वाटते. गद्दारी झाल्यानंतरही गद्दारीचा कीड आपल्या या गडला लागली नाही. लोकसभेला गड राखल्यानंतर आता विधानसभेची लढाई आहे. या निवडणुकीत परभणी जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या चारही उमेदवारांना आपल्याला विजयी करावेच लागेल, जर या निवडणुकीत हे जर झाले नाही तर महाराष्ट्र आपल्या हातून गेला असे समजा, असे मी म्हणतोय, त्याला कारण आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
आता निवडणुका आल्याने मोदी, शहा यांच्या महाराष्ट्रातील फेऱ्या सुरू झाल्या. त्यांना महाराष्ट्र म्हणजे नोटा छापायचे मशीन वाटते. त्यांची महायुती म्हणजे काय, तर महाराष्ट्राची अधोगती आणि गुजरातची प्रगती याला महायुती म्हणतात. महाराष्ट्रातील सर्व गुजरातला नेत आहे. देशाचा पंतप्रधान राज्यातील एका नेत्याच्या प्रचारासाठी येण्याची गरज काय, संविधान केंद्रात बदलले जाते, विधानसभेत नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
काँग्रेस संविधानाचे लाल पुस्तक घेत फिरतात, ते कोरे असल्याचा बिनबुडाचा आरोप ते करतात. अमित शहा यांनी जय शहाला काय करायचे आहे, ते सांगा. जय शहा याने येथील कोणाशीही क्रिकेट खेळावे. त्याने बॅटिंग करणाऱ्यांची विकेट काढून दाखवावी, तसेच गोलंदाजाच्या चेंडूवर षटकार मारून दाखवावा. गृहमंत्री महाराष्ट्रात प्रचारसभा घेत आहे. तिथे चीन देशात घुसतोय. मणीपूर धुमसत आहे. देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री राज्यात प्रचार करत होते. त्यावेळी 31 महिलेवर बलात्कार करत तिला जिंवत जाळण्यात आले. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे. अत्याचार झालेली महिला त्यांची लाडकी बहीण नव्हती काय, मणीपुरातही यांचे सरकार आहे. तिथे यांना डोळे वटारता येत नाही. निल्लज्जपणाचा हा कळस आहे. मोदी यांनी पंतप्रधानपद आणि शहा यांनी गृहमंत्रीपद सोडावे. पक्षाचे पूर्णवेळ प्रचारक व्हावे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. देशात अशी घटना घडत असताना ते प्रचारात गुंतले आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
अनेक निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांनी भाजप सोडला आहे. हा आमचा पक्ष नाही, असे त्यांचे मत आहे. नड्डा म्हणतात, आता आम्हाला संघाची गरज नाही. ते आता संघालाही संपवत आहे काय. जन्मदात्या संस्थेची गरज नसलेले तुमच्या मदतीला येतील का, मणीपूर धुमसत असताना पंतप्रधान तिथे जात नाहीत, ते संकंटात आपल्या मदतीला येतील काय, असा सवालही त्यांनी केला. ते 1500 रुपयांची मदत देतात आणि सर्वत्र विचारतात आले का पैसे, मिळाली का मदत. आम्ही कर्जमुक्ती केली होती पण असा गाजावाजा केला नाही. महागाई वाढली आहे. त्यात 1500 रुपयात काय होणार, शेतमालांचे भाव पडले आहेत. पण गद्दारांचे भाव वाढले आहेत.
आपले सरकार आल्यावर आपण ही परिस्थिती बदलणार आहोत. पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार आहोत. बेरोजागार युवकांना चार हजार रुपये मदत करण्यात येणार आहे. महिलांना 3 हजार रुपये देण्यात येणार आहे. मुलींप्रमाणेच मुलांनांही मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. मोदी आताही पंडित नेहरूंनी काय चुका केल्या, ते सांगत आहे. मात्र, 10 वर्षात यांनी काय केले, ते सांगत नाही. यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामातही भ्रष्टाचार केला. मिंधे म्हणतात, हवेने पुतळा कोसळला, हवेने मिंधेंची दाढी उडत नाही आणि पुतळा कोसळला. आमच्या दैवताचा तो पुतळा होता. याचा धडा जनताच त्यांना शिकवणार आहे.
महायुतीच्या काळात महिलांच्या तक्राराही घेतल्या जात नाही. जनता रस्त्यावर उतरल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली. तसेच आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. असे महायुतीच्या काळात होत आहेत. महिलाही असुरक्षित आहे. राज्यातील उद्योग गुजरातला जात आहे. विदर्भाने भाजपला आशिर्वाद दिले. त्यांनी विदर्भातला टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला पळवला. आता छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र हवा की मोदी, शहा, अदानी यांचा महाराष्ट्र हवा, हे तुम्ही ठरवायला हवे. हातात मशाल घ्या, भ्रष्ट सरकारचा कारभार जाळून टाका. या जिल्ह्यातून चार आमदार निवडून येणारच. तसेच राज्यात महायुतीचा एकही उमेदवार येणार नाही, असे मतदान करा, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.