
आमदार बच्चू कडू यांनी तिसर्या आघाडीत येण्याचे निमंत्रण दिले असले तरी त्यावर मराठा समाजाच्या 29 ऑगस्ट रोजी होणार्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आरोपांबाबतही जरांगे यांनी आश्चर्य व्यक्त केले.
आंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांनी मिंधे सरकार, देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ यांना धारेवर धरले. मराठा समाजाला सशक्त करण्याचे माझे स्वप्न आहे. पण मराठा समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊ नये असा दुष्ट मनसुबा अनेकजण बाळगून आहेत. परंतु मराठा समाज आता जागृत झाला आहे. असे कितीही मनसुबे उधळून लावण्याची ताकद मराठा समाजात आहे, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे यांचे भांडण नकली असल्याचा आरोप केला होता. हा आरोप आपल्यासाठी धक्कादायक असल्याचे मनोज जरांगे म्हणाले. आमदार बच्चू कडू यांनी तिसर्या आघाडीत येण्याचा आग्रह केला आहे. त्यांच्या आमंत्रणावर 29 ऑगस्टच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.
भाजप आमदार पंकजा मुंडे यांनीही मनोज जरांगे यांच्यावर अप्रत्यक्ष टिपणी केली होती. मात्र पंकजा मुंडे यांच्यावर बोलण्यास जरांगे यांनी सपशेल नकार दिला. मराठा आरक्षणाला कुणाचा विरोध आहे हे समजून घेण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.