
नागपूरचे वकील सतीश उके यांना आर्थर रोड तुरुंगातून तळोजा तुरुंगात हलवण्याचा निर्णय बेकायदाच होता, असे स्पष्ट करीत विशेष पीएमएलए न्यायालयाने ईडी व आर्थर रोड तुरुंगाच्या अधीक्षकांना झटका दिला.
सतीश उके यांनी तळोजा तुरुंगात हलवण्याच्या निर्णयाला आव्हान देत पुन्हा आर्थर रोड तुरुंगात ठेवण्याबाबत निर्देश देण्याची विनंती केली होती. ही विनंती पीएमएलए न्यायालयाने 15 जून रोजी मान्य केली आणि त्यांना आर्थर रोड तुरुंगात ठेवण्याचे आदेश दिले. त्या आदेशाचा पुनर्विचार करण्याची विनंती करीत ईडीने केलेला अर्ज विशेष पीएमएलए न्यायाधीश अजय डागा यांनी फेटाळला. न्यायालयाची परवानगी घेतल्याशिवाय पैद्याला एका तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात हलवणे बेकायदा आहे, असा निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. त्या निकालाचा विचार करता उके यांना न्यायालयाच्या परवानगीशिवाय आर्थर रोड तुरुंगातून तळोजा तुरुंगात हलवण्याचा निर्णय बेकायदा होता, असे निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदवले.