योगासन या प्राचीन खेळाचा 2026मध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. आशियाई ऑलिम्पिक परिषदेने (ओसीए) रविवारी (दि. 8) झालेल्या 44व्या सर्वसाधारण बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. याचबरोबर हिंदुस्थानचे रणधीर सिंह यांची 2024 ते 28 पर्यंत ‘ओसीए’च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
रणधीर सिंह म्हणाले, ‘जपानमध्ये होणाऱ्या आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत योगासन क्रीडा प्रकाराचा केवळ प्रदर्शनीय खेळ म्हणून समावेश करण्यात आला आहे. 2026च्या आशियाई स्पर्धेचे वेळापत्रक आधीच तयार करण्यात आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
केवळ दहा दिवसांच्या कालावधीत आम्ही ‘ओसीए’च्या सर्व सदस्यांना योगासनांबद्दल समजून सांगण्यात यशस्वी ठरल्याने या खेळाचा किमान प्रदर्शनी खेळ म्हणून समावेश करू शकलो. इतर खेळांमध्ये तरी शारीरिक इजा होण्याची शक्यता असते. मात्र, योगासन हा असा खेळ आहे की, यामुळे शरीर आणखी ताजेतवाने बनते’, अशी माहितीही त्यांनी दिली.
…2030च्या आशियाई स्पर्धेत योगासन असेल!
जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत योगासन क्रीडा प्रकाराची उपस्थिती दाखवावी लागणार आहे. त्यामुळे 2030च्या आशियाई स्पर्धेत या खेळाला वेळापत्रकात स्थान देण्यात येईल. त्यासाठी योगासनाचे फायदे इतर देशांना समजावून सांगावे लागतील. इतर देशांत योग प्रशिक्षक पाठविणे व तिकडे योगासनाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हिंदुस्थानसारख्या देशाला पुढाकार घ्यावा लागणार आहे, असेही रणधीर सिंह यांनी सांगितले.