शिवद्रोही कोरटकरचा कारागृहातील मुक्काम वाढला, जामिनावर आता 9 एप्रिलला सुनावणी

शिवद्रोही प्रशांत कोरटकरचा कळंबा कारागृहातील मुक्काम पुन्हा एकदा वाढला आहे. त्याच्या जामीन अर्जावर आज जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांच्यासमोर दोन्ही बाजूंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद झाला. यावर आता येत्या 9 एप्रिल रोजी निर्णय होणार आहे. येत्या 12 एप्रिल रोजी कोरटकरची 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी संपणार आहे. त्यापूर्वी न्यायालय त्याचा जामीन मंजूर करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या नागपूरच्या प्रशांत कोरटकरविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याच्या विरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. महिनाभर पळून गेलेल्या कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातून अटक केली होती. त्याला येथील न्यायालयात हजर केले असता, पहिल्यांदा तीन दिवस, दुसऱ्यावेळी दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

शहीद जवानांच्या कुटुंबीयांना ‘ती’ रक्कम देणार – इंद्रजित सावंत

इंद्रजित सावंत यांच्यामार्फत आज वकिलांकडून कारागृहात प्रशांत कोरटकरला कारागृह अधीक्षकांकडून अब्रुनुकसानीची नोटीस बजावण्यात आली. या अब्रुनुकसानीची तूर्त कसल्याही रकमेची नोंद नसली, तरी जी रक्कम मंजूर होईल, ती सर्व मराठा रेजिमेंटमधील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना देण्यात येईल, असे इंद्रजित सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.