
एल्फिन्स्टन पूल शुक्रवारी रात्रीपासून बंद करण्यात येणार होता. मात्र, आमचे पुनर्वसन झाल्याशिवाय पूल तोडू देणार नाही अशी आक्रमक भूमिका रहिवाशांनी घेतल्यामुळे हा पूल तूर्तास वाहतुकीसाठी बंद केलेला नाही. सोमवारी प्रकल्पबाधितांची एमएमआरडीए, म्हाडा, पालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत तोडगा निघाला तरच हा पूल वाहतुकीसाठी बंद होईल.
वरळी-शिवडी कनेक्टरसाठी एल्फिन्स्टन पूल तोडून डबलडेकर पूल उभारण्यात येणार आहे. आधी आमचे पुनर्वसन करा, अशी मागणी प्रकल्पबाधितांची असताना त्याकडे दुर्लक्ष करत एमएमआरडीएने शुक्रवारी रात्री जेसीबी लावून परळच्या दिशेकडून तोडकामाला सुरुवात केली. संतापलेल्या रहिवाशांनी पाडकाम बंद पाडले. याची दखल घेत सरकारने एमएमआरडीएला प्रकल्पबाधितांशी चर्चा करण्याचे आदेश दिले. दरम्यान, सोमवारी आमची एमएमआरडीएसोबत बैठक होणार असली तरी ही बैठक कुठे आणि किती वाजता होणार याबाबत अजून आम्हाला कळवले नाही, असे एका रहिवाशाने सांगितले.