संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दहा जणांची एसआयटी टीम नेमण्यात आली आहे. हे विशेष तपास पथक बीडमध्ये तपास करून आपला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करेल. हा एसआयटी अहवाल आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल निर्णय होईल, असे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले.
धनंजय मुंडे यांचा 100 टक्के राजीनामा झाला पाहिजे – प्रणीती शिंदे
महाराष्ट्रामध्ये दिवसाढवळ्या सरपंचाचे खून होत आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बीडच्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी 100 टक्के राजीनामा दिला पाहिजे. कारण ते यात आहे असे दिसते, असे काँग्रेस खासदार प्रणीती शिंदे म्हणाल्या. गुन्हेगार जेलमध्ये बसून मुलाखती देत आहेत. त्यांच्यासाठी स्टुडिओ सेटअप केला जातो. गुन्हेगारांना व्हीआयपी ट्रीटमेंट देत असतील, डॉक्टरांवरती पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव येत असेल तर सामान्य माणसांनी जायचे कुठे, असा संतप्त सवाल प्रणीती शिंदे यांनी केला.
सरकारने नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा घ्यावा – सुप्रिया सुळे
शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा काही घडले तर नैतिक जबाबदारी म्हणून अनेकांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेस सरकारच्या काळातही राजीनामे घेतले गेले. अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांचावर आदर्श घोटाळ्याचा आरोप झाला तेव्हा त्यांनीही राजीनामा दिला होता. सरकारने नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे राजीनामा घेतला पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुनील तटकरे यांच्याकडून धनंजय मुंडेंची पाठराखण
धनंजय मुंडे हे संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी अथवा संशयित नाहीत. हत्येची चौकशी सुरू असून त्यातून जे निष्पन्न होईल त्याला अनुसरून निर्णय घेण्यात येईल. देशमुख हत्या प्रकरण अतिशय दुर्दैवी असून त्यांच्या मारेकऱ्यांची कुठलीही गय न करता त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, अशी आमची मागणी आहे, परंतु विरोधक सातत्याने त्यांना राजकीय भूमिकेतून लक्ष्य करत आहेत. मुंडे हे या प्रकरणात आरोपी नाहीत की त्यांचे नाव संशयित म्हणूनही पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालेले नाही. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही, असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.
अजित पवार होणार बीडचे पालकमंत्री?
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडचा पालकमंत्री कोण? होणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महायुतीच्या वाटपात बीडचे पालकमंत्रीपद अजितदादा गटाकडे जाण्याची शक्यता असून उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे आणि बीड या दोन्ही जिह्यांचे पालकमंत्री होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
सरपंच हत्या प्रकरण समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावरही आरोप होऊ लागले आहेत. त्यांना पालकमंत्री करू नये, अशी मागणी विरोधकांबरोबर सत्ताधाऱ्यांकडून जोर धरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांनी बीडचे पालकमंत्री पद स्वीकारावे अशी मागणी केली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी पालकमंत्री पदासाठी आमची पहिली पसंती ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. जर मुख्यमंत्री झाले नाहीत तर अजितदादा झाले तरी चालतील, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
…ते सुतासारखा बीड सरळ करतील
अजित पवार बीड जिह्याचे पालकमंत्री झाल्यास आमची काहीच हरकत नाही. ते सुतासारखा बीड जिल्हा सरळ करतील. मी अजितदादांच्या हाताखाली काम केले आहे. वेड्यावाकड्या गोष्टी त्यांना जमत नाहीत. ते स्पष्टपणे सांगतात की, हे भंगार आहे, हे करू नका, असे सुरेश धस म्हणाले.