लग्नाचे दिलेले वचन मोडले किंवा लग्नाचे आश्वासन पूर्ण केले नाही म्हणून एखाद्या पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही. सहमतीने नातेसंबंधात राहणाऱया जोडप्यांमध्ये ब्रेकअप झाले म्हणून एखाद्या पुरुषाविरोधात फौजदारी खटला चालवला जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय देत सर्वोच्च न्यायालयाने एका तरुणाला मोठा दिलासा दिल्याचे वृत्त आहे.
एका महिलेने आपल्याला लग्नाचे आश्वासन देऊन ते पूर्ण न केल्याने 2019 मध्ये प्रियकराविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला होता. याविरोधात प्रियकराने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती एन. कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू होती. ब्रेकअपमुळे सहमतीने नातेसंबंधात राहणाऱया जोडप्यांमध्ये फौजदारी कारवाई केली जाऊ शकत नाही. जेव्हा नातेसंबंध विवाहापर्यंत पोहोचत नाहीत तेव्हा सुरुवातीच्या टप्प्यात दोन्ही पक्षांमधील सहमतीने प्रस्थापित झालेल्या संबंधांना गुन्हेगारी रंग दिला जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले. बार ऍण्ड बेंचने याबाबतचे वृत्त दिले आहे.
काय आहे प्रकरण
एका महिलेने 2019 मध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आरोपीने तिला शारीरिक संबंध ठेवण्याची आणि तसे न केल्यास तिच्या कुटुंबीयांना नुकसान पोहोचवण्याची धमकी दिली होती. महिलेच्या तक्रारीनंतर आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याविरोधात आरोपीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली होती. दिल्ली उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात तरुणाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. दरम्यान, दोन्ही पक्षकार आता विवाहित असून न्यायालयाने हा खटलाच रद्द केला आहे.