वन्यजीव संशोधक तेजस ठाकरे आणि ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन यांनी जंगलातील जैवविविधतेचा खजिना उलगडला आहे. गेल्या वर्षभरात जंगल आणि सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांमध्ये राहणाऱ्या दहा दुर्मिळ प्रजातींचा शोध त्यांनी लावला आहे. यामध्ये साप, खेकडा, पाल आणि सरडा यांचा समावेश आहे. नवीन वर्षात अधिक जोमाने काम करून अजून दुर्मिळ प्रजाती शोधण्याचा मानस या टीमने व्यक्त केला आहे.
जंगलांत भ्रमंती करून निसर्गाच्या जैवविविधतेतील नावीन्य शोधण्याचा प्रयत्न तेजस ठाकरे आणि ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनकडून नेहमीच केला जातो. याआधीही त्यांनी खेकडे, मासे, पाली अशा 11 हून अधिक दुर्मिळ वन्य प्रजातींचा शोध लावून त्यांना नवी ओळख मिळवून दिली आहे. त्यांच्या या कार्याची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली आहे. पालींवर संशोधनावर त्यांचा शोध निबंध जर्मनीमधून प्रकाशित होणाऱ्या ‘व्हर्टब्रेट झुलॉजी’ या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत यापूर्वीच प्रकाशित झाला आहे.
संशोधनात अनेक पाली
निमास्पिस टायग्रीस, निमास्पिस सक्लेशपुरेनासिस, निमास्पिस विजयाई आणि इतर पालींच्या नवीन प्रजातींचा शोध या टीमने लावला आहे. अशा प्रजाती हिंदुस्थानसह श्रीलंका, थायलंड, सुमात्रात आढळून येतात. आतापर्यंत देशातील पालीच्या 68 प्रजाती समोर आल्या आहेत.
तेजस ठाकरे यांनी सह्याद्रीच्या पर्वत रागांतील आंबोली घाटात माशाची चौथी नवीन प्रजाती समोर आणली. हिरण्यकेशी नदीत सोनेरी रंगाचे केस असणाऱ्या माशांचा शोध त्यांनी लावला. या नव्या प्रजातीच्या माशाचे नाव ‘हिरण्यकेशी’ असे ठेवण्यात आले आहे. याचा संस्कृत अर्थ सोनेरी रंगाचे केस असणारा असा आहे.
ऑगस्ट महिन्यात तेजस ठाकरे यांनी सापाच्या नव्या प्रजातीचा शोध लावला. या सापाला ‘सह्याद्रीओफिस’ असे नाव दिले आहे. या शोधामुळे पश्चिम घाटातील जैवविविधतेची नवनवीन माहिती उलगडत आहे. सापाच्या नव्या प्रजातीसंबंधीचा शोधनिबंध लंडनच्या नॅशनल हिस्ट्री म्युझियम व जर्मनीतील प्लँक इन्स्टिटय़ूट या नियतकालिकात प्रकाशित झाला आहे.