एकाच दिवसात 189 मेट्रिक टन डेब्रिज जमा करून विल्हेवाट, 243 किमीचे रस्तेही धुऊन केले स्वच्छ; पालिकेची ‘संपूर्ण स्वच्छता’ वेगात

मुंबईत वाढणारे हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी वेगाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली असून धूळ नियंत्रणासाठी घनकचरा विभागाकडून डेब्रिज संकलन आणि विल्हेवाटीवर भर देण्यात आला. आज एकाच दिवसात तब्बल 189 मेट्रिक टन डेब्रिज संकलन करून त्याची विल्हेवाटही लावण्यात आली. शिवाय 243 किलोमीटर लांबीचे रस्ते पाण्याने धुऊन स्वच्छ करण्यात आले. तसेच नियमभंग करणाऱ्यांकडून 2 हजार 500 रुपयांचा दंडदेखील वसूल करण्यात आला आहे.

वातावरणातील बदलांमुळे मुंबईत हवेच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होऊन वायू प्रदूषणात वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर वायू प्रदूषण नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रमाणित कार्यपद्धती यापूर्वीच लागू करण्यात आली आहे. मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात आणि उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

असे होतेय काम

मुंबई महानगरात गत 54 आठवड्यांपासून संपूर्ण स्वच्छता मोहीम सुरू आहे. या मोहिमेला व्यापक स्वरूप देत दर शनिवारी प्रत्येक प्रशासकीय विभागात (वॉर्ड) नियमितपणे स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. संपूर्ण 227 स्थानिक संस्था प्रभागांमध्ये ही मोहीम निरंतर सुरू आहे.

यामध्ये 1 हजार 682 कामगार, कर्मचाऱ्यांनी 190 संयंत्राच्या सहाय्याने ही कामगिरी केली आहे. जेसीबी, डंपर, कॉम्पॅक्टर, मेकॅनिकल स्वीपर, ई-स्वीपर, लीटर पीकर मशीन, कचरा संकलन करणारी वाहने, पाण्याचे टँकर अशी विविध आणि फायरेक्स मशीन, मिस्टिंग मशीन यासह अन्य अद्ययावत यंत्रणा दिमतीला होती.

मुंबई विद्यापीठ स्थायी समिती सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि विद्यार्थी तक्रार निवारण समिती सदस्यपदी शशिकांत झोरे, किसन सावंत यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले.