आठवड्याला 70 तास काम केले पाहिजे, तरच देशाची उन्नती होईल असे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी अलीकडेच म्हटले होते. यावरून आता कामाच्या संतुलनाबाबत वादविवाद सुरू झाले आहेत. उद्योजक गौतम अदानी यांनी कामाचे संतुलन साधताना कुटुंबालाही वेळ द्यायला हवा असे म्हटले आहे. हे सांगताना जर 8 तास बायकोसोबत घालवले तर बायको पळून जाईल, असे विधान त्यांनी केले.
आयुष्यात तुम्ही जे करत आहात त्यामुळे तुम्हाला आनंद मिळत असेल तर तुम्ही खऱ्या अर्थाने आनंदी आयुष्य जगत आहात. बाकी तुमचे कामाचे संतुलन माझ्यावर लादता येणार नाही आणि माझे कामाचे संतुलन तुमच्यावर लादता येणार नाही. तुम्ही हे पाहिलेच असेल की, दिवसातले चार तास तुम्ही कुटुंबासोबत घालवत आहात आणि तुम्हाला आनंद मिळत आहे. काही लोक बायकोसोबत आठ तास घालवतात. जर तुम्ही बायकोसोबत आठ तास घालवले तर तुमची बायको पळून जाईल, असे अदानी म्हणाले.
आपली मुले आपल्याकडे पाहूनच शिकतात
काम आणि वैयक्तिक आयुष्याचा ताळमेळ तेव्हाच साधता येईल, जेव्हा तुम्हाला जी गोष्ट आवडते आणि ती तुम्ही करता. आपल्यासाठी कुटुंब आणि आपले काम इतकेच जग आहे. आपली मुलेही आपल्याकडेच पाहून शिकतात. इथे कुणीही कायमचा आलेला नाही. ही गोष्ट ज्याला समजली त्याचे आयुष्य सोपे होईल, असेही अदानी म्हणाले.
काय म्हणाले होते नारायण मूर्ती…
देशात 80 कोटी लोक गरीब आहेत. कारण त्यांना रेशनमधून मोफत अन्नधान्य दिले जाते. त्यामुळे आपल्याला आपल्या अपेक्षा आणखी वाढवल्या पाहिजेत. त्यासाठी युवकांनी आठवड्यात 70 तास काम केले पाहिजे, असे इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती म्हणाले होते. आपण कठोर मेहनत करून देशाला क्रमांक एकवर नेले पाहिजे. आर्थिक विकास साध्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होण्याची मोठी गरज आहे. यासाठी जर आपण कठोर मेहनत करणार नसू तर कोण करणार, असा सवालही त्यांनी केला होता. गरिबीसारख्या समस्या सोडवण्यासाठी तरुणांनी त्यांच्या महत्त्वाकांक्षा आणखी वाढवायला हव्यात आणि त्या पूर्ण करण्यासाठी झटून काम करायला हवे, असेही त्यांनी नमूद केले होते.