कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील प्रेसिडेन्शियल डिबेट 10 सप्टेंबर रोजी होणार आहे. जो बायडन यांच्याऐवजी डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार म्हणून कमला हॅरिस यांच्या नावाची घोषणा झाल्यापासून अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची झाली आहे. कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील लढतीवर फक्त अमेरिकेचेच नाही तर संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे. दोघांमधील प्रेसिडेन्शियल डिबेट अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. प्रेसिडेन्शियल डिबेट म्हणजे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांमधील वादविवाद. यात दोन्ही उमेदवार आपापल्या भूमिका, मते मांडतात. प्रतिस्पर्ध्यावर शाब्दिक हल्ला चढवतात. या डिबेटमधून दोन्ही उमेदवार राष्ट्राध्यक्षपदासाठी तेच कसे योग्य आहेत हे जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करतात. साहजिकच या डिबेटविषयी फक्त अमेरिकेतच नव्हे तर जगभरात कुतूहल आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचारादरम्यान होणारी ही प्रेसिडेन्शियल डिबेट अमेरिकन नागरिक मोठय़ा संख्येने टीव्हीवर पाहतात.
कुठे होईल वादविवाद
10 सप्टेंबर रोजी फिलाडेल्फिया येथील नॅशनल कॉन्स्टिटय़ूशनल सेंटर येथे रात्री 9 वाजता (हिंदुस्थानी वेळेनुसार सकाळी 7 ते 8) अध्यक्षीय वादविवाद रंगेल. अमेरिकन ब्रॉडकास्टर एबीसीने या कार्यक्रमाचे आयोजन केलेय. त्याचे लाईव्ह प्रसारण होईल. या वेळी एकही प्रेक्षक उपस्थित नसेल. वादविवाद सत्र 90 मिनिटे चालेल. यादरम्यान दोन वेळा ब्रेक होईल. या आधी 28 जून रोजी जो बायडन विरुद्ध डोनाल्ड ट्रम्प यांच्यात डिबेट झाली होती.
आजी-आजोबांच्या आठवणीत भावुक
जगभरात रविवारी ग्रॅण्डपॅरेंट्स डे साजरा करण्यात आला. आजी-आजोबा दिनाचे औचित्य साधून हिंदुस्थानी वंशाच्या कमला हॅरिस आजी-आजोबांच्या आठवणीत भावुक झाल्या. आजी-आजोबांनी लोकांची सेवा आणि उज्ज्वल भविष्यासाठी लढा दिला ही प्रेरणा माझ्यात आजही जिवंत आहे, असे कमला म्हणाल्या. तरुणपणी मी आजी-आजोबांना भेटायला जायचे, तेव्हा ते मला सकाळी त्यांच्यासोबत फिरायला घेऊन जायचे. समानतेसाठीचा लढा आणि भ्रष्टाचाराविरोधातील लढाई या विषयांवर माझ्याशी तासन्तास चर्चा करायचे. ते सेवानिवृत्त सिव्हील सर्व्हंट होते. देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात त्यांनी भाग घेतला होता, असे कमला हॅरिस म्हणाल्या.
जय्यत तयारी
गेल्या काही दिवसांपासून कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प डिबेटची जोरदार तयारी करत आहेत. कमला हॅरिस मागील पाच दिवसांपासून पिट्सबर्गच्या एका हॉटेलात थांबल्या आहेत. ट्रम्पदेखील प्रतिनिधी सभेचे सदस्य मॅट गेट्ज यांच्यासोबत तयारी करत आहेत.
डिबेटचा परिणाम
या डिबेट्सचा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील मतदानावर मोठा प्रभाव पडू शकतो. डेमोक्रेटिक पक्षाच्या कमला हॅरिस या एक कुशल डिबेटर म्हणून ओळखल्या जातात, तर दुसऱया बाजूला रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प हे सुद्धा जबरदस्त डिबेटर आहेत. ट्रम्प यांनी 2016 आणि 2020 मधील प्रेसिडेन्शियल डिबेटमध्ये दाखवून दिले होते की, ते एक तगडे प्रतिस्पर्धी आहेत.