
दहिसर येथील निष्ठावंत शिवसैनिक व माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार लालचंद पाल यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गरीब नवाज नियाज कमिटी या व्हॉट्सअॅप ग्रुपवर एकाने लालचंद यांना ठार मारण्याबाबतचा संदेश पोस्ट केला होता. याप्रकरणी लालचंद पाल यांनी एमएचबी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
दहिसरच्या कांदरपाडा परिसरात राहणारे लालचंद पाल यांचे किराणा मालाचे दुकान आहे. ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निष्ठावंत शिवसैनिक असून सध्या ते शिवसेना शाखा क्र. 1 येथे कार्यालय प्रमुख म्हणून काम करत आहेत. 1 एप्रिल रोजी गरीब नवाज नियाज कमिटी या व्हॉट्सअॅप ग्रुपवर एका मोबाईलधारकाने लालचंद यांना उद्देशून एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली. ‘जैसा अभिषेक को मारा वैसा लालचंद को भी मारेंगे’ असा इंग्रजीमध्ये संदेश पोस्ट करण्यात आला होता. माझा मित्र रियाज हा त्या ग्रुपचा सदस्य आहे. जेव्हा आम्ही तो संदेश पाहण्याचा प्रयत्न केला असता तेव्हा तो ग्रुपमधून डिलीट करण्यात आला होता. त्या ग्रुपचा अॅडमिन आबिद शेख हा असून यालादेखील त्या मेसेजसंदर्भात कल्पना असावी, असे लालचंद पाल यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे. या धमकीच्या संदेशामुळे माझ्या जिवाला धोका निर्माण झाला असून माझे कुटुंबीय प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत. संबंधितांवर तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी लालचंद यांनी केली आहे. लालचंद हे दिवगंत अभिषेक घोसाळकर यांच्या अत्यंत जवळचे सहकारी होते. तसेच लालचंद यांचे घोसाळकर कुटुंबीयांशी घरगुती संबंध आहेत.
अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणात लालचंद हे प्रमुख साक्षीदार आहेत. त्यामुळे लालचंद यांना अशा प्रकारे धमकावणे गंभीर बाब आहे. लालचंद हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत, पण त्याचबरोबर आमचे घरगुती संबंध आहेत. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन धमकीचा संदेश पोस्ट करणाऱ्यावर तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी घोसाळकर कुटुंबीयांनी केली आहे. दरम्यान, अभिषेक हत्या प्रकरण सध्या सीबीआयकडे आहे. लालचंद हे प्रमुख साक्षीदार असल्याने त्यांना आलेल्या धमकीबाबत सीबीआयलादेखील अवगत करणार असल्याचे घोसाळकर कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.