नुकताच काँग्रेस पक्षात सामील झालेल्या बजरंग पुनियाला आता जीवे मारण्याची धमकी आली आहे. काँग्रेस सोड नाहीतर तुला आणि तुझ्या कुटुंबासाठी हे चांगले नसेल, असा व्हॉट्सऍपवर एक मेसेज आल्यामुळे बजरंगने सोनीपत बहालगढ पोलीस ठाण्यात आपली तक्रार केली आहे.
गेल्या दीड वर्षापासून कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध महिला कुस्तीपटू लैंगिक प्रकरणी आंदोलन करणारा बजरंग पुनिया विनेश फोगाट आणि साक्षी मलिकच्या खांद्याला खांदा लावून भिडतोय. तीन दिवसांपूर्वीच त्याने विनेशसह हरयाणा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे हरयाणाचे राजकारण चांगलेच तापले आहे. त्याला घाबरविण्यासाठी विरोधी यंत्रणा सज्ज झाल्याची आज झलक मिळाली असून त्याने काँग्रेस सोडावी नाहीतर त्याला आणि त्याच्या कुटुंबाला गंभीर परिणाम भोगावे लागतील.
हा आमचा शेवटचा मेसेज आहे. निवडणुकीच्या आधी आम्ही दाखवून देऊ की आम्ही काय आहोत ते. तुला जिथे तक्रार करायची असेल तेथे खुशाल कर. ही आमचा पहिला आणि शेवटचा इशारा असल्याचा हा मेसेज पुनियाला पाठवण्यात आला आहे. या मेसेजबाबत तक्रार करतातच पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून त्यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे.