प्रसूतीदरम्यान मातेसह बाळाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी जव्हारच्या पतंगशाह उपजिल्हा रुग्णालयात घडली. कुंता फडवळे असे या ३१ वर्षीय मृत महिलेचे नाव असून या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. आठवडाभरातील अशा प्रकारची ही दुसरी घटना असून शासकीय रुग्णालयातील ढासळलेली आरोग्य व्यवस्था यानिमित्ताने चव्हाट्यावर आली आहे.
मोखाडा येथील आशा भुसारे या महिलेचा रक्तस्रावामुळे मृत्यू झाल्याची घटना 26 डिसेंबर रोजी घडली होती. त्यानंतर जव्हारच्या उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा असाच प्रकार घडला आहे. वाडा तालुक्यातील गालतरे येथे राहणारी गर्भवती आदिवासी महिला कुंता फडवळे ही विक्रमगडमधील ग्रामीण रुग्णालयात नियमित उपचार घेत होती. मात्र तिथे आवश्यक त्या सुविधा नसल्याने कुंता हिला जव्हारच्या रुग्णालयात जाण्यास सांगितले. मात्र तिथेही अधिक उपचार होऊ शकले नाहीत.
स्थानिक डॉक्टरांनी कुंता हिच्या नातेवाईकांना जव्हारच्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तिला ३१ डिसेंबर रोजी रात्री उशीरा आणण्यात आले. मध्यरात्रीच्या सुमारास डॉ. आशीष सोनवणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तिची प्रसूती केली. त्यावेळी अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने प्रसूतीदरम्यानच महिलेचा मृत्यू झाला. मात्र बाळाचे ठोके सुरू असल्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी केला, पण काही मिनिटातच त्याचाही मृत्यू झाला.
कायमस्वरूपी स्त्रीरोगतज्ज्ञच नाही
ोआदिवासीबहुल भाग असलेल्या जव्हार तालुक्यात आरोग्य सुविधेचा चांगलाच बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. जव्हारच्या उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी स्त्रीरोगतज्ज्ञच नसल्याने वसई, विरार येथून मानधनावर डॉ. आशीष सोनवणे व डॉ. बोरखडे हे काम करतात. योग्य त्या सुविधा व आवश्यक त्या प्रमाणात डॉक्टर, नर्सेस नसल्यामुळे आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. लवकरात लवकर रिक्त पदे भरावीत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.