ठाण्यातील रस्त्यांच्या कामांची डेडलाईन हुकली; पालिका आयुक्तांनी घेतली अधिकाऱ्यांची हजेरी

deadline-for-road-works-in-thane-missed

ठाणे शहरात सुरू असलेल्या रस्त्यांची कामे गेल्या काही महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत आहेत. त्यातच घोडबंदर भागातील दोन्ही बाजूंचे सर्व्हिस रोड खोदून ठेवले असल्याने त्याचा नाहक त्रास वाहनचालकांना होत आहे. ही कामे 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. मात्र अद्याप कामे पूर्ण झाली नसल्याने ठाण्यातील रस्त्यांच्या कामांची डेडलाईन हुकली आहे. दरम्यान पालिका आयुक्त सौरभराव यांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांची हजेरी घेत रस्त्यांच्या कामांसाठी आता 31 मेचा वायदा दिला आहे.

रस्ते दुरुस्तीची सर्व कामे 15 मेपर्यंत पूर्ण करून सगळे रस्ते वाहतूक योग्य करण्याचे निर्देश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, एमएमआरडीए या सर्व यंत्रणांना दिले आहेत. ठाणे क्षेत्रातील मान्सूनपूर्व कामांसंदर्भात जानेवारी अखेरीस पार पडलेल्या नियोजन समितीच्या बैठकीत प्रशासनाने सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने सर्व प्राधिकरणाने आपल्या अखत्यारित कामे 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले होते. आता पुन्हा नवीन डेडलाईन देण्यात आली असून दर 15 दिवसांनी पाहणीही केली जाणार आहे.

गायमुख घाटाची दुरुस्ती

गायमुख घाट येथे 800 मीटर रस्त्याची गतवर्षीप्रमाणेच दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यासाठी आयआयटी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

वेळोवेळी पाहणी

पूर्व द्रुतगती महामार्गावर ज्युपिटर हॉस्पिटललगतच्या सेवा रस्त्यावर पाणीपुरवठा विभागाचे काम सुरू आहे. कापूरबावडी जंक्शन येथे मेट्रोची कामे, सिनेवंडर मॉल या भागात सुरू असलेल्या पेट्रोल पंप ते नळपाडा जंक्शनपर्यंत मेट्रो, घोडबंदर रोड सेवा रस्ता, उड्डाणपुलाच्या शेजारील सेवा रस्ते, गटारे तसेच जलवाहिनीच्या कामाची पाहणी करण्यात आली. तसेच, आवश्यक ते नियोजन करण्यास आयुक्तांनी सांगितले.

कापूरबावडी जंक्शनवर अतिरिक्त वॉर्डन

कापूरबावडी जंक्शन येथील मेट्रोचे काम मार्गी लागेपर्यंत अधिक वॉर्डन तैनात करावेत. त्यांनी वाहतूक सुरळीत होण्यासाठी कायम सतर्क असावे, अशी सूचना आयुक्त राव यांनी दिल्या. २० एप्रिलपर्यंत कापूरबावडी येथील पेपर कंपनी लगतचा छोटा पूल लहान वाहनांसाठी खुला केला जाईल, असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.