वारंवार होणारे सव्र्व्हर डाऊन व काही लाभार्थ्यांच्या हाताचे ठसे न उमटणे या अडचणींमुळे गडहिंग्लज तालुक्यातील शासनमान्य रेशनधान्य दुकानातून रेशन कार्डवरील लाभार्थ्यांची वेळेत ई- केवायसी होत नसल्याचे दिसत आहे. त्यातच याची मुदत 31 डिसेंबरपर्यंतच असल्याने रेशनधान्य दुकानांमध्ये मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे शासनाने ई- केवायसीसाठी पुन्हा मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने गडहिंग्लजचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, गडहिंग्लज तालुक्यातील अनेक गावांत सध्या रेशन कार्डवर नावे समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये वयोवृद्ध, मजूर कामगार तसेच लहान मुलांच्या हाताचे ठसे योग्य पद्धतीने मशीनवर उमटत नाहीत, त्यामुळे अडचण निर्माण होत आहे. अशा लोकांकरिता पर्यायी उपाययोजना करून त्यांना नियमित धान्य पुरवठा करणे गरजेचे आहे.
या ई-केवायसीसाठी सध्या लोकांची धावपळ सुरू आहे. मात्र, वारंवार सर्व्हर डाऊन होणे, काम वेळेत पूर्ण न होणे, यामुळे रेशन धान्य दुकानदारांकडे ई- केवायसीसाठी लाभार्थ्यांना वारंवार जावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे. हे टाळण्यासाठी ई- केवायसीकरिता रेशन धान्य दुकानांव्यतिरिक्त आपले सरकार केंद्र अथवा इतर ऑनलाइन कामे करणाऱ्या केंद्रांनाही रेशन कार्डधारकांची ई-केवायसी करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, जेणेकरून दुकानदाराकडे गर्दी होणार नाही व लोकांचीही होणारी धावपळ थांबेल. तसेच ई-केवायसीची 31 डिसेंबरपर्यंत असणारी मुदत पुन्हा वाढवावी व दिलासा द्यावा, अशी मागणी या निवेदनातून केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी तालुकाप्रमुख दिलीप माने, अजित खोत, उपतालुकाप्रमुख वसंत नाईक, शहरप्रमुख प्रकाश रावळ, दिगंबर पाटील, अनिल खाणाई, संकेत रावण, संभाजी येडूरकर, सोमनाथ कोरी, महेश मोरे, कल्लाप्पा जंगली, आपया भोई, बाळकृष्ण कडुकर, आपया पटणकुडी, साईप्रसाद कोरी, नबीसाब ढेपेदार यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.