Crime News – पुण्यातील भंगार व्यावसायिकाची बिहारमध्ये हत्या, पोलिसांचा तपास सुरू

पुण्यातील एका भंगार व्यावसायिकाची बिहारमध्ये हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. जहानाबादच्या घोसी पोलीस स्टेशन परिसरातील माननपूर गावाजवळ 12 एप्रिल रोजी एक मृतदेह आढळला. यानंतर चौकशीदरम्यान सोमवारी 14 एप्रिल रोजी मृतदेहाची ओळख पटली. लक्ष्मण साधू शिंदे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण हा पुण्यातील भंगार व्यापारी होता. गेल्या अनेक वर्षांपासून तो भंगार व्यवसायात करत होता. दरम्यान, पुण्यातील भंगार व्यावसायिकाचा बिहारमध्ये मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतदेह सापडल्यानंतर स्थानिक लोकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. चौकशीदरम्यान पाटणा विमानतळ पोलीस ठाण्यात या व्यावसायिकाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

जहानाबादचे पोलीस अधीक्षक अरविंद प्रताप सिंह यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. घोसी पोलीस ठाण्यात व्यावसायिकाचा अनैसर्गिक मृत्यू झाला असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पाटणाच्या पोलीस अधिकाऱ्यांशी देखील चर्चा झाली आहे. नालंदा आणि जहानाबादचे पोलिसही तपास करत आहेत. जर गुन्हेगारांनी व्यावसायिकाला पाटणा, नालंदा, नवादा आणि जहानाबादच्या सीमेवर नेले असेल तर त्या सर्व मुद्द्यांवरही चौकशी सुरू आहे. गुन्हेगारांबद्दल माहिती फक्त पाटणा पोलिसच देऊ शकतील. त्यामुळे आमची संपूर्ण टीम या प्रकरणाचा तपास करत आहे.