महायुतीत चढाओढ; मिंध्यांकडून मुख्यमंत्री सहायता निधीला समांतर वैद्यकीय कक्ष स्थापन

महायुतीतली धुसफूस संपताना दिसतच नाहीये. आधी पालकमंत्रीपदावरून मिंधे गट आणि भाजपमधले मतभेद समोर आले होते. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला समांतर वैद्यकीय मदत कक्ष उभारला आहे. या कक्षाची जबाबदारी मंगेश चिवटे यांच्याकडे दिली असून चिवटे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी संपर्क साधून गरजूंना वैद्यकीय मदत देणार आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना केली आहे. या कक्षाची जबाबदारी त्यांचे विश्वासू मंगेश चिवटे यांच्याकडे देण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहायता निधी असताना उपमुख्यमंत्र्यांनी वेगळा कक्ष स्थापन करण्याची ही पहिलीच घटना आहे. उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष हा आरोग्य विभागाच्या साथीने मदत करेल पण या कक्षाच्या माध्यमातून थेट आर्थिक मदत केली जाणार नाही असे चिवटे यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थापन केलेला वैद्यकीय मदत कक्ष हा मुख्यमंत्री सहायता निधीला पूरक ठरेल तसेच या कक्षाच्या माध्यमातून गरजू आणि गरीब रुग्णांना मदत केली जाईल असेही चिवटे म्हणाले.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मंगेश चिवटे हे मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख होते. शिंदे मुख्यमंत्री असताना 32 हजार रुग्णांना 267.5 कोटी रुपयांची मदत करण्यात आली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर रामेश्वर नाईक यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीची धुरा सोपवण्यात आली.

उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना प्रभावी पद्धतीने राबवली जाईल. या कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना थेट आर्थिक मदत केली जाणार नाही, पण मुख्यमंत्री सहायता निधी, धर्मादाय संस्था, राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम आणि केंद्राच्या आयुष्मान भारत योजनेसाठी मार्गदर्शन केले जाईल. या कक्षाच्या माध्यमातून गरीब आणि गरजूंना सरकारी योजनातून मोफत उपचार मिळेल यासाठी प्रयत्न केले जातील असे चिवटे म्हणाले.

तसेच या कक्षाच्या माध्यमातून रुग्णांसाठी अवयव प्रत्यारोपण सारख्या महागड्या शस्त्रक्रियांसाठी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून निधी उभारला जाईल. त्यासाठी राज्य सरकारच्या योजना, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट आणि टाटा ट्रस्टसोबत सहकार्य केले जाईल असेही चिवटे म्हणाले.