लहान मुलांचे मोबाईलचे व्यसन धोकादायक वळण घेऊ शकते. मोबाईल अचानक काढून घेतला किंवा त्यांना मोबाईल दिला नाही तर अनेकदा मुले हिंसक होतात. अनेकदा तर ती टोकाचे पाऊल उचलतात. असले दुष्परिणाम रोखण्यासाठी आता दाउदी बोहरा समाजाने महत्त्वाचे पाऊल उचलल्याचे वृत्त आहे. मुलांना ‘मोबाईलबंदी’ करण्यात आली आहे. 15 वर्षांखालील मुलांच्या मोबाईल वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. शाळा समुदायाच्या गटांमध्ये याबाबत जनजागृती करण्यासाठी कार्यशाळा आणि सेमिनार्स घेतले जात असल्याचे समोर आले आहे. दाउदी बोहरा समाजाकडून जागतिक स्तरावर अशा प्रकारचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान या वयात या मुलांना काय योग्य किंवा अयोग्य काय याचे आकलन नसते, अशी समाजाची भूमिका असल्याचे समोर आले आहे.
मुलांनी काय करावे?
मुलांना वाचन, मैदानी खेळ आणि कुटुंबासमवेत अधिकाधिक वेळ घालवण्यासाठीची संधी या गोष्टी करता याव्यात, त्यातून त्यांचा मानसिक विकास व्हावा हा मोबाईलबंदीमागचा प्रमुख हेतू असल्याचे समाजाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मोबाईल वापर कमी करण्यासंदर्भात सर्वच वयोगटांसाठी मार्गदर्शक सूचना असतील.
मुलांच्या मानसिक वाढीवर विपरीत परिणाम
मोबाईलचा अतिवापर किंवा मोबाईल हाताळण्याच्या व्यसनामुळे मुलांच्या मानसीक वाढीवर विपरित परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुलांना त्यांच्या मानसिक विकासाच्या अवस्थेत मोबाईल देणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यामुळे त्यांना मोबाईलचे व्यसन जडू नये यासाठी ठोस पावले उचलावी किंवा त्यांना मोबाईल दिला जाऊ नये, असा सल्ला अनेक डॉक्टर्स आणि मानसोपचारतज्ञ देतात.
सोशल मीडिया आणि अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा अतिवापर
मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडिया आणि इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सचा वापर मुलांमध्ये वाढू लागला आहे. त्यातून सायबरबुलिंग, ऑनलाईन फसवणूक, आक्षेपार्ह मजकूर सहज उपलब्ध होणे असे प्रकार घडू लागले आहेत. मुले फसवणुकीच्या या प्रकारांमध्ये अडकून त्यांचे मोठे नुकसान करून घेऊ शकतात, अशी भूमिकाही समजाकडून मांडण्यात आली आहे. मोबाईलच्या अतिवापराचा लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर, शारिरीक हालचालींवर परिणाम होत असल्याची बाब दाउदी बोहरा समाजाने अधोरेखित केली आहे.