ऑस्ट्रेलियन भूमीवर पाकिस्तानविरुद्ध सलग सोळा विजयांची मालिका कायम राखणाऱया यजमानांना मालिकेत पाहुण्यांचा व्हाईट वॉश करायचाय. त्यामुळे पाकिस्तानसमोर ‘सतराचा खतरा’ कायम आहे. पाकिस्तानने मेलबर्नमध्ये जोरदार संघर्ष केला होता आणि सिडनीतही त्यांना त्याचीच पुनरावृत्ती करायचीय. सलग दोन्ही कसोटींत हार मिळाल्यामुळे पाकिस्तानसमोर व्हाईट वॉशचे संकट असले तरी त्यांना वर्षाची सुरुवात विजयाने करायची आहे. सिडनीत यशाचे दान कुणाच्या पारडय़ात पडते ते पहिल्या दिवसाच्या खेळानंतर कळेल.
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने पर्थ आणि मेलबर्नचे मैदान गाजवल्यानंतर ते आता सिडनी येथे होणाऱया तिसऱया आणि अखेरच्या कसोटी सामन्यात विजय मिळवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
शेवटच्या कसोटीसाठी दोन्ही संघांनी आपले अंतिम संघ जाहीर केले असून पाकिस्तानने संघात मोठे फेरबदल केले आहेत. त्यांनी स्फोटक गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीलाच बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत अपयशी ठरलेल्या सलामीवीर इमाम उल हक यालादेखील बेंचवर बसवण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. आता शाहिनच्या जागी ऑफस्पिनर साजिद खानला संधी देण्यात आली आहे, तर 21 वर्षीय श्याम अयुबची निवड केली आहे. अलीकडेच या फलंदाजाने पाकिस्तान कपमध्ये चांगली फलंदाजी केली होती, त्यानंतर त्याला कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे.
शाहीन आफ्रिदी गेल्या एक वर्षात जास्त क्रिकेट खेळला आहे. त्यामुळे त्याला विश्रांतीची गरज आहे, तर इमान हा सध्या खराब फॉर्ममधून जात असल्याने त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले असल्याचे कर्णधार शान मसूदने सांगितले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांत दणदणीत विजय मिळविल्यामुळे त्यांनी सिडनी कसोटीसाठी संघात कोणताही बदल केलेला नाही.
ऑस्ट्रेलियन संघ ः पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशन, स्टीव्ह स्मिथ, ट्रव्हिस हेड, मिचेल मार्श, ऍलेक्स कॅरी (यष्टिरक्षक), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवूड.
पाकिस्तान संघ ः अब्दुल्ला शफीक, श्याम अय्युब, शान मसूद, बाबर आझम, सऊद शकील, मोहम्मद रिझवान, सलमान अली आगा, साजिद खान, हसन अली, मीर हमजा, आमिर जमाल.
निवृत्तीपूर्वीच वॉर्नरची ‘बॅगी ग्रीन’ चोरीला
डेव्हिड वॉर्नरची ‘बॅगी ग्रीन’ म्हणजे त्याची कसोटी क्रिकेटची कॅप निवृत्तीपूर्वीच चोरीला गेली आहे. एकीकडे कारकीर्दीचा शेवट गोड कसा करता येईल? या विचारात असणाऱया वॉर्नरची मौल्यवान किमतीची बॅग चोरीला गेल्याने तो चिंतीत झाला आहे. या बॅगेत त्याची ‘बॅगी ग्रीन’ही चोरीला गेल्यामुळे त्याने सोशल मीडियावर आपला व्हिडीओ शेअर केला असून ती बॅग परत देण्याचे आवाहन त्याने केले आहे. मी माझ्या मुलींसाठी काही भेटवस्तू खरेदी केल्या होत्या. त्या भेटवस्तू आणि माझी टोपी त्या बॅगेमध्ये होती, मात्र कोणीतरी माझी ती मौल्यवान बॅग चोरली आहे. या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या असून त्या परत मिळाव्या अशी माझी इच्छा आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करणे हा माझ्याकडे उरलेला शेवटचा पर्याय असून जर तुम्ही ती बॅग परत केली तर मी तुम्हाला काही करणार नाही, अशा शब्दांत वॉर्नरने व्हिडीओमधून आवाहन केले आहे.