नागपूरमध्ये एका 54 वर्षीय सासूचा त्यांच्याच सुनेने खून केला. आपल्या दूरच्या दोन भावांना या महिलेने सुपारी दिली होती. पण पाच वर्षाच्या मुलीने माहिती दिल्याने हा सगळा गुन्हा उलगडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूरमध्ये 54 वर्षांच्या सुनीता राऊत या 33 वर्षांची सून वैशाली राऊत आणि पाच वर्षाच्या नातीसोबत राहत होते. वैशाली राऊत यांच्या पतीचे निधन झाले होते.
सुनीता राऊत यांनी एक जमीन विकली होती आणि त्याचे त्यांना 60 लाख रुपये मिळाले होते. हे पैसे आपल्याला मिळावे अशी वैशाली यांची इच्छा होती. पण सुनीता राऊत यांनी हे पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे दोघींमध्ये वाद झाला. वैशाली राऊत यांनी मध्य प्रदेशमध्ये राहणारे आपले दोन भाऊ रितेश हिवसे आणि श्रीकांत उर्फ समीर हिवसेला दोन लाख रुपयांची सुपारी दिली.
हे दोघे नागपूरला आले आणि त्यानी गळा आवळून सुनीता राऊत यांचा खून केला. वैशाली यांनी सगळ्यांना सांगितले की सुनीता यांना हार्ट अटॅक आला आहे आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली. तेव्हा वैशालीच्या मोबाईलमधून बँकेत मोठे ट्रान्झेक्शन दिसले. पोलिसांनी या प्रकरणी सुनीता यांची नात आणि वैशाली यांच्या पाच वर्षाच्या मुलीची चौकशी केली. तेव्हा मुलीने पोलिसांना सांगितले की दोन मामा आले, त्यांनी आजीचा गळा दाबला आणि मारून टाकले. मुलीच्या या जबाबावरून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.